YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 34

34
अदोम व इतर राष्ट्रे ह्यांच्याविरुद्ध परमेश्वराचा कोप
1अहो राष्ट्रांनो, ऐकायला जवळ या; लोकांनो कान द्या; पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, जग व त्यात उपजलेले सर्वकाही ऐकोत.
2कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यांवर होत आहे; त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे; त्याने त्यांचा वध करण्यास लावले आहे.
3त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील, त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील.
4आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.
5कारण माझ्या तलवारीस आकाशात उन्माद चढला आहे; पाहा, शासन करण्यासाठी अदोमावर, ज्या लोकांचा सर्वस्वी नाश करण्याचे मी योजले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
6परमेश्वराची तलवार रक्ताने भरली आहे. मांद्याने, कोकरांच्या व बकर्‍यांच्या रक्ताने, एडक्यांच्या गुर्द्यांच्या मांद्याने पुष्ट झाली आहे; कारण परमेश्वर बसरा येथे यज्ञ, अदोमाच्या देशात महावध करणार आहे.
7रेडे, रानबैल व गोर्‍हे हे सर्व त्यांच्याबरोबर पडतील; त्यांच्या रक्ताने त्यांची भूमी भिजून जाईल; तेथली माती मांद्याने भरून जाईल.
8सीयोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय.
9त्याचे ओढे राळ बनतील, त्याची धूळ गंधक होईल व त्याचा देश राळेसारखा जळेल.
10तो रात्रंदिवस विझणार नाही; त्याचा धूर सदा चढत राहील; पिढ्यानपिढ्या तो ओसाड पडेल; त्यात कोणी कधीही संचार करणार नाही.
11पाणकोळी व साळू त्याचे मालक होतील; घुबडे व डोमकावळे तेथे वस्ती करतील; आणि परमेश्वर अव्यवस्थेचे सूत्र व शून्यतेचा ओळंबा त्यावर लावील.
12त्याच्या सरदारांना राजपदासाठी बोलावतील पण कोणी सापडायचा नाही; त्याचे सर्व अधिपती नाहीतसे होतील.
13त्याच्या राजवाड्यात काटेरी झुडपे उगवतील व त्याच्या किल्ल्यात खाजकुईली व काटेझाडे उगवतील; तो कोल्ह्यांचे वसतिस्थान व शहामृगांचे अंगण होईल.
14तेथे वनपशू कोल्ह्यांना भेटतील, बोकडरूपी पिशाच्च आपल्या सोबत्यास हाक मारील; निशाचरही तेथे राहून आराम पावेल.
15तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करील, अंडी घालून उबवील व तेथील छायेत पिलांचे संगोपन करील; तेथे गिधाडे जोडप्याजोडप्यांनी जमा होतील.
16परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा; ह्या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही; कोणी जोडप्यावाचून असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, त्याच्या श्वासाने त्यांना एकत्र केले आहे.
17त्याने त्यांच्यासाठी चिठ्ठी टाकली आहे, त्याने आपल्या हाताने मापनसूत्र लावून देश त्यांना वाटून दिला आहे; ते त्याचे सर्वकाळचे वतनदार होतील, ते पिढ्यानपिढ्या त्यात राहतील.

सध्या निवडलेले:

यशया 34: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन