YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 23

23
परमेश्वराच्या मेळ्यास येण्यास मज्जाव असलेले लोक
1जो भग्नांड आहे अथवा ज्याचे लिंगच्छेदन झाले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.
2जारजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये.
3अम्मोनी आणि मवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये;
4कारण तुम्ही मिसर देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत, एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम-नहराईम1 येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले.
5तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही; उलट तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्याकरता त्या शापाचा आशीर्वादच केला, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची तुझ्यावर प्रीती होती.
6तू आपल्या हयातीत त्याचे क्षेमकुशल कधीही चिंतू नकोस.
7अदोम्याचा तुला वीट नसावा, कारण तो तुझा बंधू होय; मिसर्‍यांचा तुला वीट नसावा, कारण तू त्याच्या देशात उपरा होतास.
8त्यांच्या तिसर्‍या पिढीत जन्मलेल्या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्याची परवानगी आहे.
युद्धछावणीत राखायची शुद्धता
9तुझ्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी बाहेर पडून तू तळ देशील तेव्हा सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा.
10जर कोणा पुरुषाला रात्री काही अशुद्धता आपोआप प्राप्त झाली तर त्याने छावणीबाहेर जावे, त्याने छावणीच्या आत येऊ नये;
11पण संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्तानंतर छावणीच्या आत यावे.
12तुला बहिर्दिशेस जाण्यासाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी;
13आणि तुझ्या हत्यारांमध्ये एक कुदळ असावी, तू बहिर्दिशेस बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा, नंतर आपला मळ झाकून टाकावास.
14कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो, म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस, नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल.
निरनिराळे नियम
15एखादा दास आपल्या धन्यापासून पळून जाऊन तुला शरण आला तर त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नकोस,
16त्याने आपल्या पसंतीनुसार निवडलेल्या ठिकाणी तुझ्या एखाद्या गावात तुझ्याबरोबर राहावे; त्याला जाच करू नकोस.
17इस्राएलकन्यांपैकी कोणीही वेश्या2 होऊ नये, आणि इस्राएलपुत्रांपैकी कोणालाही पुंमैथुनास वाहू नये.
18वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या3 प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.
19आपल्या बांधवांशी व्याजबट्ट्याचा व्यवहार करू नकोस, पैशावर व्याज, अन्नधान्यावर वाढ किंवा इतर कोणत्याही पदार्थावर वाढीदिढी करू नकोस.
20वाटल्यास परदेशीयाशी वाढीदिढीचा व्यवहार कर, पण आपल्या बांधवाशी करू नकोस, म्हणजे जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे ज्या ज्या कामाला तू हात घालशील त्यात तुझा देव परमेश्वर तुला आशीर्वाद देईल.
21तू आपला देव परमेश्वर ह्याला नवस करशील तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर तुला त्याचा अवश्य जाब विचारील; विलंब लावल्यास तुला पाप लागेल.
22तथापि तू नवस न करण्याचे ठरवलेस तर तुला पाप लागणार नाही.
23ज्या अर्थी तू आपल्या मुखाने वचन देऊन आपला देव परमेश्वर ह्याला स्वखुशीने नवस केला आहेस त्या अर्थी तुझ्या मुखातून निघालेले वचन काळजीपूर्वक पाळ.
24आपल्या शेजार्‍याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नकोस.
25आपल्या शेजार्‍याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजार्‍याच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस.

सध्या निवडलेले:

अनुवाद 23: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन