YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 24

24
घटस्फोटाविषयी नियम
1एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली, तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे.
2त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा;
3पण त्या पुरुषाची तिच्यावर इतराजी होऊन त्यानेही सूटपत्र लिहून तिच्या हाती दिले व तिला घराबाहेर काढले, किंवा तिच्याशी लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला, 4तर तिला घालवून देणार्‍या पहिल्या नवर्‍याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये, कारण परमेश्वराला ह्या गोष्टीचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस.
5एखाद्या पुरुषाचे नुकतेच लग्न झाले असल्यास त्याने सैन्याबरोबर मोहिमेवर जाऊ नये, अथवा काहीही कामगिरी त्याच्यावर टाकण्यात येऊ नये; त्याने वर्षभर घरीच राहावे आणि आपल्या बायकोला रंजवावे.
निरनिराळे नियम
6जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवून घेऊ नये; असे करणे म्हणजे मनुष्याचे जीवितच गहाण ठेवून घेणे होय.
7आपल्या एखाद्या इस्राएल बांधवाला कोणी चोरले आणि तो त्याला दासाप्रमाणे वागवताना किंवा विकताना आढळला, तर त्या चोराला जिवे मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
8महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.
9तुम्ही मिसर देशातून निघाल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याने वाटेत मिर्यामेचे काय केले ह्याचे स्मरण ठेवा.
10आपल्या शेजार्‍याला तू कोणत्याही प्रकारचे कर्ज दिलेस तर त्याच्याबद्दल तारण आणण्यासाठी त्याच्या घरात शिरू नकोस.
11तू बाहेर उभे राहावेस आणि ज्याला तू कर्ज दिले असेल त्याने त्याच्याबद्दलचे तारण तुझ्याकडे बाहेर आणावे.
12तो मनुष्य कंगाल असला तर त्याचे तारणादाखल घेतलेले वस्त्र अंगावर घेऊन झोपू नकोस,
13सूर्य मावळत आहे तोच त्याचे तारण त्याला अवश्य परत कर म्हणजे तो आपले वस्त्र अंगावर घेऊन निजेल आणि तुझे अभीष्ट चिंतील; आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुझे नीतिमत्त्व ठरेल.
14तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणार्‍या उपर्‍यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नकोस,
15त्याला ज्या दिवसाची मजुरी त्याच दिवशी दे, कारण तो गरीब असल्यामुळे त्याचे सारे लक्ष मजुरीकडे लागलेले असते. ती सूर्यास्तापलीकडे ठेवू नकोस. ठेवलीस तर तो तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्‍हाणे करील आणि तुला पाप लागेल.
16मुलांसाठी बापांना जिवे मारू नये अथवा बापांसाठी मुलांना जिवे मारू नये; जो गुन्हा करील त्यालाच त्याच्या गुन्ह्याबद्दल जिवे मारावे.
17उपर्‍याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस,
18तू मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडवले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे.
19तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणायला परत जाऊ नकोस; उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी ती राहू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल.
20तू आपला जैतुनवृक्ष झोडशील तेव्हा एकदा झोडलेली फांदी पुन्हा झोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे.
21आपल्या द्राक्षमळ्यातली द्राक्षे खुडशील तेव्हा राहिलेली पुन्हा तोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे.
22तू मिसर देशात दास होतास ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा करीत आहे.

सध्या निवडलेले:

अनुवाद 24: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन