अनुवाद 22
22
1आपल्या एखाद्या बांधवाचा बैल अथवा मेंढरू भटकत असलेले पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस; ते अवश्य आपल्या बांधवाकडे पोचते कर.
2तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखत नसलास तर ते जनावर आपल्या घरी आण, आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्याजवळ राहू दे; आणि मग ते त्याच्या हवाली कर.
3तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर; आणि तसेच त्याच्या वस्त्राबाबतीत कर; आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली तर तिच्या बाबतीतही तसेच कर; ती पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस.
4आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस, त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर.
5स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणार्या प्रत्येकाचा वीट आहे.
6वाटेने जाताना झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे कोटे तुला आढळले, मग त्यात पिले असोत किंवा अंडी असोत, त्या पिलांवर अथवा अंड्यांवर मादी बसलेली असली तर तिला पिलांसहित धरू नकोस;
7तुला हवी असली तर पिले घेऊन जा, पण त्यांच्या आईला अवश्य सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तू चिरायू होशील.
8तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध; नाहीतर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील.
9आपल्या द्राक्षमळ्यात दुसरे कोणतेही बी पेरू नकोस, पेरलेस तर सबंध उत्पन्न म्हणजे पेरलेल्या बीचे उत्पन्न आणि द्राक्षाचे उत्पन्न दोन्ही जप्त करण्यात येतील.
10बैल व गाढव ह्यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नकोस.
11लोकर व सण ह्यांच्या मिश्रणाचे कापड अंगात घालू नकोस.
12आपल्या पांघरायच्या वस्त्राच्या चारही टोकांना गोंडे लाव.
पातिव्रत्याविषयी नियम
13एखाद्या पुरुषाने स्त्रीशी लग्न केले व तिच्यापाशी गेल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली,
14आणि त्याने तिच्यावर भलभलते आरोप ठेवून तिची बदनामी करून म्हटले की, ‘मी ह्या स्त्रीशी लग्न करून तिच्यापाशी गेलो तेव्हा तिच्या ठायी मला कौमार्यचिन्हे आढळली नाहीत;’
15तर मुलीच्या आईबापांनी तिची कौमार्यचिन्हे घेऊन गावच्या वडीलवर्गाकडे वेशीत जावे,
16मुलीच्या बापाने वडीलवर्गाला म्हणावे की, ‘मी आपली कन्या ह्या पुरुषाला दिली आणि आता ती त्याला आवडत नाही;
17पाहा, तो तिच्यावर भलभलते आरोप ठेवून म्हणतो की, तुमच्या कन्येच्या ठायी मला कौमार्यचिन्हे आढळली नाहीत; पण ही पाहा माझ्या मुलीची कौमार्यचिन्हे.’ मग त्यांनी ती चादर गावच्या वडीलवर्गापुढे पसरावी;
18आणि गावच्या वडीलवर्गाने त्या पुरुषाला धरून शिक्षा करावी;
19त्याच्याकडून शंभर शेकेल रुपे दंडादाखल वसूल करून मुलीच्या बापाला द्यावे, कारण त्याने एका इस्राएल कन्येची बदनामी केली आहे; त्याने तिला बायको म्हणून नांदवले पाहिजे, तिचा त्याग त्याने आमरण करता कामा नये.
20पण त्या मुलीच्या ठायी कौमार्यचिन्हे नव्हती हे सिद्ध झाल्यास,
21वडीलवर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा; कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्राएलात भ्रष्टाचार केला आहे; ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
22एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे; अशा प्रकारे इस्राएलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
23वाग्दत्त कुमारी एखाद्या पुरुषाला गावात आढळली आणि त्याने तिच्याशी गमन केले,
24तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा म तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजार्याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला; ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
25वाग्दत्त कुमारी एखाद्या पुरुषाला रानात आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला, तर त्या गमन करणार्या पुरुषाला मात्र जिवे मारावे;
26पण त्या कुमारीला काही करू नये; मरणदंडास पात्र असा काही गुन्हा तिच्या हातून घडलेला नाही; कारण एखाद्याने आपल्या शेजार्यावर चालून जाऊन त्याला जिवे मारावे तसाच हा प्रकार समजावा.
27कारण ती वाग्दत्त कुमारी त्याला रानात आढळली आणि ती ओरडली तेव्हा तिचा बचाव करायला कोणी नव्हते.
28वाग्दत्त नाही अशी कुमारी एखाद्या पुरुषाला आढळली व त्याने तिला धरून तिच्याशी गमन केले व ते दोघे सापडले,
29तर तिच्याशी गमन करणार्या पुरुषाने मुलीच्या बापाला पन्नास शेकेल रुपे द्यावे आणि ती त्याची बायको व्हावी; कारण त्याने तिला भ्रष्ट केले आहे. त्याने आमरण तिचा त्याग करता कामा नये.
30कोणी आपल्या सावत्र आईशी विवाह करू नये; आपल्या बापाची बेअब्रू करू नये.
सध्या निवडलेले:
अनुवाद 22: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.