YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 21

21
अज्ञात रक्तपातासंबंधी नियम
1तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून घ्यायला देत आहे तेथे उघड्यावर कोणी मनुष्य मारून टाकलेला आढळला आणि त्याला कोणी मारले हे कळले नाही, 2तर तुझ्यातील वडीलवर्ग व न्यायाधीश ह्यांनी तेथे जाऊन त्या प्रेताच्या सभोवार असलेल्या प्रत्येक गावाचे अंतर मोजावे;
3मग जो गाव त्या प्रेताच्या सर्वांत जवळचा असेल त्यातल्या वडीलवर्गाने कामास कधी न लावलेली अथवा कधी न जुंपलेली अशी एक कालवड घ्यावी;
4आणि ज्यात नांगरणी पेरणी होत नसते व ज्यात पाणी सतत वाहत असते अशा खोर्‍यात तिची मान मोडावी;
5तेव्हा लेवी वंशातल्या याजकांनी पुढे व्हावे; कारण त्यांनी परमेश्वराची सेवा करावी, त्याच्या नावाने आशीर्वाद द्यावा, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वादाचा व मारामारीचा निर्णय व्हावा ह्यासाठी तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना निवडले आहे.
6मग त्या मारून टाकलेल्या मनुष्याच्या सर्वांत जवळच्या असलेल्या नगरातील वडीलवर्गाने त्या खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या कालवडीवर आपले हात धुवावेत;
7आणि स्पष्ट म्हणावे की, ‘आमच्या हातून हा रक्तपात झाला नाही आणि आम्ही डोळ्यांनी पाहिला नाही.
8हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस त्यांना क्षमा कर; तुझ्या इस्राएल लोकांमध्ये निरपराध माणसाच्या हत्येचा दोष राहू देऊ नकोस. ह्या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.’ 9ह्या प्रकारे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करून निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू आपल्यातून काढून टाकावास.
युद्धकैदी स्त्रियांशी ठेवायची वर्तणूक
10तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला गेलास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या हाती दिले आणि तू त्यांना बंदिवान केलेस,
11आणि बंदिवानांत एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्यावर तू मोहित झालास, तिला बायको करून घेण्याची तुला इच्छा झाली;
12तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावीत.
13मग तिने आपल्या परस्वाधीन स्थितीतली वस्त्रे टाकून तुझ्या घरी एक महिनाभर आपल्या आईबापासाठी शोक करावा; ह्यानंतर तू तिच्यापाशी जावे म्हणजे तू तिचा पती होशील व ती तुझी पत्नी होईल.
14ती तुला आवडेनाशी झाली तर तिला वाटेल तिकडे जाऊ दे, पण तिच्याबद्दल पैसा घेऊन तिला मुळीच विकू नकोस, तिला दासीप्रमाणे वागवू नकोस, कारण तू तिला भ्रष्ट केले आहेस.
प्रथमजन्मलेल्या अपत्याविषयी नियम
15एखाद्या पुरुषाला एक आवडती व एक नावडती अशा दोन बायका असल्या आणि त्या आवडत्या व नावडत्या अशा दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असले आणि नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असला,
16तर तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्यांचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असताना त्याच्या ऐवजी आवडतीच्या पुत्राला ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने देऊ नये.
17पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा; कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचाच आहे.
बंडखोर मुलगा
18एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला आणि आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानत नसला, आणि त्याला शासन केले तरी त्यांचे ऐकत नसला,
19तर त्याच्या आईबापांनी त्याला धरून बाहेर काढून गावाच्या वेशीत चावडीवर गावच्या वडीलवर्गासमोर न्यावे.
20आणि त्यांनी गावच्या वडीलवर्गाला सांगावे, ‘हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे; हा आमचे ऐकत नाही; हा खादाड व मद्यपी आहे.’
21मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील.
निरनिराळे नियम
22एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले,
23तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नयेस, पण त्याच दिवशी तू त्याला अवश्य पुरावेस; कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो; तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे तो देश विटाळवू नकोस.

सध्या निवडलेले:

अनुवाद 21: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन