दानीएल 9
9
आपल्या लोकांसाठी दानिएलाची प्रार्थना
1मेदी वंशातला अहश्वेरोशाचा पुत्र दारयावेश खास्द्यांच्या देशावर राजा होता त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी
2मी दानीएल शास्त्रग्रंथावरून समजलो की, यरुशलेमेच्या ओसाड दशेचा काळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील, असे परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले होते.
3हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले.
4मी आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना करून पापांगीकार केला तो असा : “हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतोस;
5आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय ह्यांपासून आम्ही परावृत्त झालो.
6तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक ह्यांना सांगितले तेही आम्ही ऐकले नाही.
7हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे; परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे; यहूदाचे लोक, यरुशलेमनिवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएल लोक ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांना निरनिराळ्या देशात हाकून लावलेस, त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे.
8हे प्रभो, आमच्या तोंडांस, आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील ह्यांच्या तोंडांस काळोखी लागली आहे. कारण आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.
9आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली
10आणि आमचा देव परमेश्वर ह्याने आपले सेवक जे संदेष्टे ह्यांच्या द्वारे आमच्यापुढे ठेवलेल्या त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वर्तण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही.
11सर्व इस्राएल लोकांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; त्यांनी पराङ्मुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही; म्हणून आमच्यावर शापाचा वर्षाव झाला आहे; देवाचा सेवक मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे. कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे.
12त्याने आमच्यावर मोठे अरिष्ट आणले; जी वचने तो आमच्याविरुद्ध व आमचा न्याय करणार्या न्यायधीशांविरुद्ध बोलला ती त्याने प्रत्ययास आणून दिली आहेत; यरुशलेमेवर जशी विपत्ती आली तशी सर्व जगावर कधी आली नाही.
13मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली आहे; तरी आपल्या अधर्मापासून परावृत्त व्हावे व तुझ्या सत्याचा उमज पडावा म्हणून आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याची काकळूत केली नाही;
14ह्यास्तव परमेश्वराने विपत्तीवर नजर ठेऊन ती आमच्यावर आणली आहे; कारण आमचा देव परमेश्वर जी काही कृत्ये करतो ती न्याय्य आहेत, पण आम्ही त्याची वाणी ऐकली नाही.
15आता हे प्रभो, आमच्या देवा, तू आपल्या सामर्थ्यवान हाताने मिसर देशातून आपल्या लोकांना बाहेर आणले व आजच्याप्रमाणे आपला महिमा वाढवला. आम्ही पाप केले आहे; आम्ही दुराचरण केले आहे.
16हे प्रभो, आपल्या सर्व न्यायकृत्यांप्रमाणे यरुशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरुशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.
17ह्यास्तव आता, हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनवण्या ऐक; तुझ्या ओसाड पडलेल्या पवित्र-स्थानावर आपला मुखप्रकाश पाड; हे प्रभो, तू आपल्याप्रीत्यर्थ हे कर.
18हे माझ्या देवा, कान दे, ऐक; आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पाहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पाहा; आम्ही आपल्या विनवण्या आमच्या नीतिमत्तेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणांस्तव तुझ्यापुढे मांडतो.
19हे प्रभू, ऐक; हे प्रभू, क्षमा कर; हे प्रभू, ऐक, कार्य कर; विलंब लावू नकोस; हे माझ्या देवा, तुझे नगर व तुझे लोक ह्यांना तुझे नाम दिले आहे; म्हणून तुझ्याचप्रीत्यर्थ हे मागतो.”
सत्तर आठवड्यांविषयी भविष्यवाणी
20मी बोलत व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्राएल ह्यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर ह्याच्याकडे विनवणी करीत असता,
21असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रीएल, दृष्टान्ताच्या आरंभी मी अगदी व्याकूळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.
22त्याने माझ्याशी संभाषण करून मला समज दिली. तो म्हणाला, “हे दानिएला, मी तुला बुद्धी देऊन चतुर करण्यासाठी आलो आहे.
23तुझ्या प्रार्थनांना आरंभ होताच आज्ञा झाली, ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परमप्रिय आहेस; तर ह्या गोष्टींचा विचार कर व हा दृष्टान्त समजून घे.
24आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.
25हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.
26बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.
27तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील; उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणार्यावर कोपाचा वर्षाव होईल.”
सध्या निवडलेले:
दानीएल 9: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.