दानीएल 10
10
दानिएलाने हिद्दकेल नदीवर पाहिलेला दृष्टान्त
1पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली; ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती; त्याला ती गोष्ट समजली; त्या दृष्टान्ताचे मर्म त्याला कळले.
2त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो.
3तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही.
4पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस महानदी हिद्दकेल (टायग्रीस) हिच्या तीरी मी असता
5मी डोळे वर करून पाहिले तर तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कंबरेस उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला.
6त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता.
7मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टान्त पाहिला; माझ्याबरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टान्त पाहिला नाही; तरी त्यांना मोठा कंप सुटला आणि कोठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले.
8मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टान्त पाहिला; माझ्यात काही त्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ती राहिली नाही.
9तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला; मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली.
10तेव्हा पाहा, एका हाताने मला स्पर्श केला, त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो.
11तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.
12तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे.
13पारसाच्या राज्याचा अधिपती एकवीस दिवस मला आडवा आला; तेव्हा पाहा, मुख्य अधिपतींपैकी एक, मीखाएल, माझ्या साहाय्यास आला; व मी पारसाच्या राजांजवळ राहिलो.
14आता ह्या शेवटच्या दिवसांत तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे; कारण दृष्टान्ताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे.”
15ह्याप्रमाणे तो हे शब्द माझ्याबरोबर बोलल्यावर मी जमिनीकडे आपले तोंड करून गप्प राहिलो.
16तेव्हा पाहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला; तेव्हा मी आपले तोंड उघडून, जो माझ्यासमोर उभा होता त्याला म्हटले, “हे माझ्या स्वामी, ह्या दृष्टांताने क्लेश पावून मी व्याकूळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही.
17स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, माझ्या स्वामीबरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कोठून? मला तर मुळी त्राण राहिले नाही; माझ्यात दम राहिला नाही.”
18तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणार्या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले.
19तो म्हणाला, “परमप्रिय मानवा, भिऊ नकोस; तुला शांती असो, हिंमत धर, नेट धर.” तो माझ्याबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, “माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिंमत आणली आहेस.”
20मग तो म्हणाला, “मी तुझ्याकडे का आलो हे तुला माहीत आहे काय? आता मी पारसाच्या अधिपतीबरोबर लढायला जातो; मी गेलो म्हणजे ग्रीसचा1 अधिपती येईल.
21सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रकट करतो; त्यांच्याबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मीखाएल ह्याशिवाय दुसर्या कोणाचे मला साहाय्य नाही.
सध्या निवडलेले:
दानीएल 10: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.