YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 8

8
दानिएलास एडका व बकरा ह्यांचा दृष्टान्त
1मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टान्त झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी मला पुन्हा दृष्टान्त झाला.
2मी दृष्टान्तात पाहिले तर मला असे दिसून आले की मी एलाम परगण्यातल्या शूशन राजवाड्यात आहे; आणखी मी दृष्टान्तात पाहिले तेव्हा मी उलई नदीतीरी आहे.
3मी डोळे वर करून पाहिले तर मला नदीसमोर दोन शिंगांचा एक एडका दिसला; ती दोन्ही शिंगे मोठाली होती; त्यांतले एक दुसर्‍याहून मोठे असून मागाहून निघाले होते.
4तो एडका पश्‍चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारीत आहे असे मी पाहिले; कोणी पशू त्याच्यासमोर उभा राहीना, व त्याच्या तडाक्यातून एखाद्यास सोडवायचे कोणास सामर्थ्य नव्हते; तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला.
5मी विचार करीत होतो तेव्हा पाहा, पश्‍चिम दिशेकडून एक बकरा सर्व पृथ्वी आक्रमून आला; येताना त्याने जमिनीस पाय लावला नाही; त्या बकर्‍याच्या डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते.
6मी जो दोन शिंगांचा एडका नदीसमोर उभा राहिलेला पाहिला होता त्याच्याकडे तो बकरा गेला; त्याने आपले सर्व बळ खर्चून त्वेषाने त्याला धडक मारली.
7मी पाहिले तेव्हा तो त्या एडक्याजवळ गेला, व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारली व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली; त्याच्यापुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती; त्या बकर्‍याने त्याला जमिनीवर पाडून तुडवले; त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडवण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते.
8तो बकरा अतिप्रबल झाला; तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्याच्याऐवजी त्याला चार बाजूंना चार ठळक शिंगे फुटली.
9त्यांतल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले; त्याची दृष्टी दक्षिणेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाली.
10त्याची वृद्धी आकाशगणांपर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या तार्‍यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडवले.
11एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला; त्याला नित्य होत असलेले यज्ञयाग त्याने बंद केले आणि त्याचे पवित्रस्थान पाडून टाकले.
12लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागांसहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले; त्याने सत्य मातीस मिळवले; त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला.
13तेव्हा मी एका पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले; दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणार्‍यास म्हणाला, “हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्रस्थान व सैन्य ही पायांखाली तुडवणे, ह्या दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार?”
14तो मला म्हणाला, “दोन हजार तीनशे दिवस;1 त्यानंतर पवित्रस्थानाची शुद्धी होईल.”
15मग असे झाले की मी दानिएलाने हा दृष्टान्त पाहिला तेव्हा त्याचा अर्थ काय हे समजण्याचा मी यत्न करू लागलो तेव्हा पाहा, मनुष्यरूपधारी अशा एकास मी माझ्यासमोर उभे राहिलेले पाहिले.
16उलई नदीच्या दोन तीरांमधून मी मनुष्यवाणी ऐकली ती अशी : “गब्रीएला, ह्या पुरुषाला हा दृष्टान्त समजावून सांग.”
17तेव्हा मी उभा होतो तेथे तो माझ्याजवळ आला; तो आला तेव्हा मी घाबरून पालथा पडलो; तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हा दृष्टान्त समजून घे; कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”
18तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली; पण त्याने मला स्पर्श करून उभे केले.
19तो म्हणाला, “पाहा, कोपाच्या शेवटल्या काळात काय होईल हे मी तुला सांगतो; कारण नेमलेल्या अंतसमयासंबंधाने हा दृष्टान्त आहे.
20दोन शिंगे असलेला एडका तू पाहिलास; ते मेदय व पारस ह्यांचे राजे.
21तो दांडगा बकरा ग्रीसचा2 राजा; त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा.
22एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली ह्याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहायचे नाही.
23त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला म्हणजे उग्रस्वरूपी, कूटप्रश्‍न समजणारा असा राजा उभा राहील.
24त्याची सत्ता बलवत्तर होईल; तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही; तो विलक्षण नाश करील. तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल; तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील.
25तो आपल्या काव्याने आपल्या हातची कारस्थाने सिद्धीस नेईल; तो उन्मत्त होऊन निर्भय असलेल्या पुष्कळ लोकांचा नाश करील; तथापि त्याच्यावर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल.
26हा जो अहोरात्रीचा3 दृष्टान्त सांगितला तो खरा आहे; हा दृष्टान्त गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे.”
27मग मी दानीएल मूर्च्छित झालो व काही दिवस आजारी पडलो; त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टान्त पाहून मी विस्मित झालो; पण तो कोणास कळला नाही.

सध्या निवडलेले:

दानीएल 8: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन