YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 18

18
अबशालोमाचा मृत्यू
1दाविदाने दाने आपल्याबरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमले.
2मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”
3लोकांनी म्हटले, “आपण येऊ नये; कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यांना काही वाटणार नाही; आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यांना काही वाटायचे नाही; पण आपण तर आमच्यातल्या दहा हजारांच्या ठिकाणी आहात; म्हणून आपण नगरात राहूनच आम्हांला कुमक पाठवावी हे उत्तम.”
4राजा त्यांना म्हणाला, “तुम्हांला योग्य वाटते तसे मी करतो.” मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला, आणि लोक शंभरशंभर, हजारहजार असे बाहेर निघाले.
5राजाने यवाब, अबीशय व इत्तय ह्यांना आज्ञा केली की, “त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमाविषयी आपल्या सरदारांना जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली.
6ह्या प्रकारे ते लोक इस्राएल लोकांशी सामना करण्यासाठी रणांगणात गेले, आणि एफ्राइमाच्या रानात लढाईला तोंड लागले.
7तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्राएल लोकांचा मोड झाला; त्या दिवशी एवढा संहार झाला की वीस हजार लोक कामास आले.
8लढाई देशभर चालली; त्या दिवशी तलवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला.
9अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता; खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्यांखालून चालले असताना अबशालोमाचे डोके त्या वृक्षाला अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्याखालून निघून गेले.
10हे पाहून एका माणसाने यवाबाला सांगितले की, “अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला.”
11यबावाने त्या खबर देणार्‍या माणसाला म्हटले, “तू त्याला तसे पाहून तेथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा शेकेल रुपे व कमरबंद दिला असता.”
12तो माणूस यवाबाला म्हणाला, “हजार रुपये माझ्या हातावर ठेवले तरी मी राजकुमारावर हात टाकणार नाही; कारण तुमच्यातल्या कोणीही त्या तरुण पुरुषाला म्हणजे अबशालोमाला हात लावू नये अशी आज्ञा राजाने तुला, अबीशयाला व इत्तयाला दिली ती आम्हांला माहीत आहे.
13मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता; तूही माझ्याविरुद्ध झाला असतास कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही.”
14यवाब म्हणाला, “तुझ्या नादी लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.” मग त्याने हाती तीन तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकले.
15यवाबाच्या दहा शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्याभोवती जमून त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले.
16मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा लोक इस्राएलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले; कारण यवाबाने लोकांची गय केली.
17तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्‍यांकडे गेले.
18आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात घेऊन अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारला होता, तो राजाच्या खोर्‍यात आहे. त्या मनोर्‍याला त्याने आपले नाव दिले; आजपर्यंत त्याला अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत.
19सादोकाचा पुत्र अहीमास म्हणाला की, “परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या.”
20यवाब त्याला म्हणाला, “आज ही खबर घेऊन जाऊ नकोस; दुसर्‍या एखाद्या दिवशी ती घेऊन जा; पण आज ती नेऊ नकोस; कारण राजाचा पुत्र मृत्यू पावला आहे.”
21नंतर यवाब एका कूशी माणसाला म्हणाला, “तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग.” तेव्हा तो कूशी यवाबाला नमन करून धावत गेला.
22सादोकाचा पुत्र अहीमास पुन्हा यवाबाला म्हणाला, “काहीही होवो पण मलाही कूशीच्या मागोमाग दौड करू दे.” यवाब म्हणाला, “माझ्या मुला, इनाम मिळण्याजोगी खबर काही तुझ्याजवळ नाही, तर का दौड करतोस?”
23तो म्हणाला, “काहीही होवो, मला धावत जाऊ दे.” त्याने त्याला म्हटले, “धाव.” तेव्हा अहीमास दौड करून मैदानाच्या वाटेने कूशीच्या पुढे निघून गेला.
24दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजांच्या दरम्यान बसला होता, आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता; त्याने दूर नजर करून पाहिले तर एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.
25पहारेकर्‍याने पुकारून राजाला ते सांगितले तेव्हा राजा म्हणाला, “तो एकटाच येत असला तर तो काहीतरी खबर घेऊन येत आहे.” इतक्यात तो मनुष्य धावत धावत जवळ येऊन पोहचला.
26पहारेकर्‍याने दुसरा एक मनुष्य धावत येताना पाहिला; तेव्हा त्याने वेसकर्‍याला हाक मारून सांगितले, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे.” राजा म्हणाला, “तोही काही खबर आणत असावा.”
27पहारेकरी म्हणाला, “पहिल्याची दौड सादोकाचा पुत्र अहीमास ह्याच्या दौडीसारखी आहे असे मला वाटते.” राजा म्हणाला, “तो भला मनुष्य आहे, त्याने काही चांगली खबर आणली असावी.”
28मग अहीमासाने येऊन “महाराजांचे क्षेम असो,” असे म्हटले, आणि जमिनीपर्यंत लवून राजाला मुजरा केला व म्हटले, “आपला देव परमेश्वर धन्य आहे, त्याने माझ्या स्वामीराजांवर हात उचलणार्‍या माणसांना आपल्या काबूत दिले आहे.”
29राजाने विचारले, “तरुण अबशालोम खुशाल आहे ना?” अहीमास म्हणाला, “यवाबाने एका सेवकाला व आपला दास जो मी त्याला पाठवले तेव्हा माझ्या दृष्टीला मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही.”
30राजा त्याला म्हणाला, “बाजूला सरून येथे उभा राहा.” तेव्हा तो बाजूस होऊन तेथे उभा राहिला.
31इतक्यात कूशीही येऊन म्हणाला, “स्वामीराजांसाठी मी खबर आणली आहे; परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे.”
32राजाने कूशीला विचारले, “तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना?” कूशी म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी करायला उठतील त्यांचे त्या तरुणासारखे होवो!”
33तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्‍गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा : तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”

सध्या निवडलेले:

२ शमुवेल 18: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन