२ शमुवेल 19
19
1“अबशालोमासाठी राजा विलाप करीत आहे” असे यवाबाच्या कानी आले.
2“राजा आपल्या पुत्रासाठी दु:ख करीत आहे” असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवशीचा तो विजय सर्व लोकांना शोकरूप झाला.
3युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवतात त्याप्रमाणे लोक लपतछपत नगरात आले.
4राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करून म्हणाला, “अरेरे! माझ्या पुत्रा अबशालोमा! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”
5यवाब घरात राजाकडे जाऊन म्हणू लागला, “आपल्या सेवकांनी आज आपला, आपल्या पुत्रांचा, कन्यांचा, पत्नींचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचवला आहे; त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे.
6आपण आपल्या द्वेष्ट्यावर प्रेम करता आणि आपणावर प्रेम करणार्यांचा द्वेष करता. आपण आज असे प्रकट केले आहे की, सरदार व सेवक हे आपणाला काहीच नव्हत; अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर आपणाला बरे वाटले असते असे मला आज समजून आले आहे.
7तर आता उठून बाहेर जा आणि आपल्या सेवकांचे समाधान करा; नाहीतर मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की, आपण बाहेर गेला नाहीत, तर आज रात्री आपल्याजवळ एकसुद्धा मनुष्य राहायचा नाही; आणि बाळपणापासून कधी ओढवले नाही असले संकट आपल्यावर ओढवेल.”
8तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांना कळले तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. इकडे इस्राएल लोक आपल्या डेर्यांकडे पळून गेले. दावीद यरुशलेमेस परत येतो 9इस्राएलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता; ते म्हणू लागले की, “राजाने आम्हांला आमच्या शत्रूंच्या हातातून सोडवले, पलिष्ट्यांच्या हातातून आमचा बचाव केला; पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे.
10आपण अबशालोमास राज्याभिषेक केला, पण तो युद्धात पडला; तर आता राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काही बोलत नाही हे काय?”
11मग दावीद राजाने सादोक व अब्याथार याजकांना सांगून पाठवले की, “यहूदी वडील जनांना सांगा, ‘राजाला मंदिरात परत न्यावे असे इस्राएल लोकांचे बोलणे चालले आहे हे राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या मंदिरात नेण्याच्या बाबतीत तुम्ही सर्वांच्या मागे का राहता?
12तुम्ही तर माझे भाऊबंद, माझ्या हाडामांसाचे आहात, तर राजाला परत घेऊन जाण्याच्या कामी तुम्ही सर्वांच्या मागे का?
13अमासाला सांगा की, तू तर माझ्या हाडामांसाचा ना? तू यवाबाच्या ठिकाणी कायमचा सेनापती झाला नाहीस तर देव माझे त्या मानाने व त्याहूनही अधिक पारिपत्य करो.”’
14ह्या प्रकारे त्याने यहूदाच्या लोकांना एकदिल करून त्यांची मने वळवली; त्यांनी राजाकडे सांगून पाठवले की, “आपण आपले सर्व सेवक घेऊन माघारी या.”’
15राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहूदी यार्देन नदीच्या अलीकडे राजाला घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले.
16यहूद्यांबरोबर बहूरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजाला सामोरा गेला.
17त्याच्याबरोबर एक हजार बन्यामिनी पुरुष होते; त्याप्रमाणेच शौलाच्या घराण्यातला सेवक सीबा हा आपले पंधरा पुत्र व वीस चाकर ह्यांना घेऊन तेथे आला; ते राजापुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले.
18राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेवली होती. राजा यार्देन उतरून जाण्यासाठी आला तेव्हा गेराचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला,
19“माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये, ज्या दिवशी माझे स्वामीराज यरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले त्याचे स्मरण करू नये. महाराजांनी ते मनात ठेवू नये.
20आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.”
21सरूवेचा पुत्र अबीशय म्हणाला, “शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय?”
22दावीद म्हणाला, “सरूवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय कर्तव्य आहे? कारण आज तुम्ही विरोधी झाला आहात, इस्राएलातल्या कोणाचा आज वध करावा काय? आज मी इस्राएलाचा राजा आहे हे मला कळत नाही काय?”
23मग राजा शिमीस म्हणाला, “तू प्राणाला मुकणार नाहीस.” राजाने त्याच्याशी आणभाक केली.
24शौलाचा नातू मफीबोशेथ हा राजाच्या भेटीसाठी आला; राजा निघून गेला होता तेव्हापासून तर तो सुखरूप घरी परत येईपर्यंत त्याने आपले पाय धुतले नव्हते; आपली दाढी नीटनेटकी केली नव्हती व वस्त्रेही धुतली नव्हती.
25यरुशलेमकर राजाला भेटायला गेले तेव्हा राजाने विचारले, “मफीबोशेथा, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”
26तो म्हणाला, “माझे स्वामीराज, माझ्या सेवकाने मला फसवले; आपला दास पंगू आहे म्हणून आपल्या दासाने विचार केला की, मी आपल्या गाढवावर खोगीर घालून त्यावर स्वार होऊन महाराजांकडे जावे.
27माझ्या सेवकाने स्वामीराजांकडे माझी चहाडी केली आहे; पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत; आता आपल्या मर्जीस येईल तसे करा.
28माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?”
29राजा त्याला म्हणाला, “तू आपल्या गोष्टी पुन्हा का काढतोस? माझी आज्ञा आहे की, तू व सीबा जमीन वाटून घ्या.”
30मफीबोशेथ राजाला म्हणाला, “माझे स्वामीराज सुखरूप आपल्या मंदिरी आले आहेत, तर सीबालाच ती सर्व जमीन घेऊ द्या.”
31मग बर्जिल्लय गिलादी हा रोगलीम येथून आला आणि राजाला यार्देनेपार पोचवण्यासाठी त्याच्याबरोबर नदी उतरून गेला.
32बर्जिल्लय फार वयातीत होता; त्याचे वय ऐंशी वर्षांचे होते. राजा महनाईम येथे तळ देऊन राहिला होता तेव्हा बर्जिल्लयाने त्याला अन्नपाणी पुरवले होते; तो फार मोठा मनुष्य होता.
33राजा बर्जिल्लयाला म्हणाला, “माझ्याबरोबर चल; मी तुला यरुशलेमेत आपल्याजवळ ठेवून तुझे पालनपोषण करीन.”
34बर्जिल्लय राजाला म्हणाला, “माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर यरुशलेमेस जावे?
35आज मी ऐंशी वर्षांचा आहे; ह्या वयात मला बर्यावाइटाचा भेद काय समजणार? आपला दास जे काही खातोपितो त्याची चव त्याला कळते काय! गाणार्यांचा व गाणारणींचा शब्द मला ऐकू येतो काय? तर आपल्या दासाने माझ्या स्वामीराजांना भार का व्हावे?
36आपला दास महाराजांबरोबर फक्त यार्देनेपार येत आहे; महाराजांनी ह्याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा?
37आपल्या दासाला परत जाऊ द्या. म्हणजे माझ्या स्वतःच्या गावी माझ्या आईबापाच्या कबरस्तानाजवळ मी मरेन; पण आपला दास किम्हाम हा हजर आहे. त्याला माझ्या स्वामीराजांबरोबर पलीकडे जाऊ द्या; मग आपणाला वाटेल ते त्याचे करा.”
38राजा म्हणाला, “किम्हामाने माझ्याबरोबर पलीकडे यावे; तुला बरे वाटेल तसे मी त्याचे करीन; तू जे काही मला सांगशील ते मी तुझ्यासाठी करीन.”
39मग सारे लोक यार्देनेपलीकडे गेले; राजाही पलीकडे गेला; राजाने बर्जिल्लयाचे चुंबन घेऊन त्याचे अभीष्ट चिंतले; आणि तो स्वस्थानी परत गेला.
40ह्या प्रकारे राजा नदी उतरून गिलगालास गेला; किम्हामही त्याच्याबरोबर गेला, यहूदाचे सर्व लोक व अर्धे इस्राएल लोक राजाला पलीकडे घेऊन गेले.
41तेव्हा सर्व इस्राएल येऊन राजाला म्हणू लागले, “आमचे बांधव यहूदाचे लोक हे आपणाला चोरून छपवून घेऊन आले; महाराजांना त्यांच्या परिवाराला व त्यांच्या सर्व लोकांना यार्देनेपार आणले असे का?”
42तेव्हा सर्व यहूद्यांनी इस्राएल लोकांना उत्तर दिले, “महाराज आमचे जवळचे आप्त आहेत, तर तुम्ही ह्याबद्दल का रुसता? आमच्या खाण्यापिण्याबद्दल महाराजांना काही खर्च झाला आहे काय? त्यांनी आम्हांला काही इनाम दिले आहे काय?”
43इस्राएल लोक यहूद्यांना म्हणाले, “महाराज दहा हिश्शांनी आमचे आहेत; तुमच्याहून आमचा दाविदावर जास्त हक्क आहे; तर तुम्ही आम्हांला तुच्छ समजून आमच्या महाराजांना माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला का घेतला नाही?” इस्राएल लोकांच्या भाषणापेक्षा यहूदी लोकांचे भाषण कठोरपणाचे होते.
सध्या निवडलेले:
२ शमुवेल 19: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.