२ राजे 2
2
एलियाचे स्वर्गारोहण
1परमेश्वराने एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगाल येथून चालला होता.
2एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे; तर तू येथेच थांब.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडणार नाही.” मग ते बेथेल येथे गेले.
3बेथेलातल्या संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.”
4एलीया त्याला म्हणाला, “अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे तर तू येथे थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते यरीहोस गेले.
5यरीहोतील संदेष्ट्यांचे शिष्य अलीशाकडे येऊन त्याला म्हणाले, “आज परमेश्वर तुझ्या धन्याला तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे हे तुला ठाऊक आहे काय?” त्याने म्हटले, “मला ठाऊक आहे, पुरे करा.”
6एलीया त्याला म्हणाला, “परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवत आहे. तू येथेच थांब.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” मग ते दोघे पुढे चालले.
7संदेष्ट्यांचे पन्नास शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले; आणि ते दोघे यार्देनेतीरी उभे राहिले.
8एलीयाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली तेव्हा पाणी दुभंगले; मग ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले.
9ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग.” अलीशा म्हणाला, “आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.”
10एलीया म्हणाला, “तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या वेळी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.”
11ते बोलत चालले असता पाहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले; आणि एलीया वावटळीतून स्वर्गास गेला.
12ते पाहून अलीशा मोठ्याने म्हणाला, “माझ्या बापा! माझ्या बापा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!” तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही; तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे दोन-दोन तुकडे केले.
अलीशा एलीयाच्या जागी येतो
13एलीयाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देनेच्या तीरावर उभा राहिला.
14एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलीशा पलीकडे गेला.
15यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले.
16ते त्याला म्हणाले, “ऐका, आपल्या सेवकांजवळ पन्नास बळकट पुरुष आहेत; त्यांना आपल्या स्वामीचा शोध करण्यास जाऊ द्या; परमेश्वराच्या आत्म्याने त्याला उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोर्यात टाकले असेल.” तो म्हणाला, “कोणालाही पाठवू नका.”
17त्यांनी त्याला एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, “पाठवा.” त्यांनी पन्नास पुरुष पाठवले. त्यांनी त्याचा तीन दिवस शोध केला, पण त्यांना तो सापडला नाही.
18ते परत आले तेव्हा तो यरीहो येथे होता; तो त्यांना म्हणाला, “जाऊ नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय?”
19त्या नगराचे रहिवासी अलीशाला म्हणाले, “पाहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीला दिसतच आहे; पण येथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही.”
20त्याने म्हटले, “एक नवे पात्र माझ्याकडे आणा व त्यात मीठ घाला.” त्यांनी ते पात्र त्याच्याकडे आणले.
21मग तो पाण्याच्या झर्यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करतो, ह्यापुढे ह्याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही.”
22अलीशाच्या ह्या वचनानुसार ते पाणी चांगले झाले, ते आजवर तसेच आहे.
23तो तेथून वरती बेथेलकडे चालला; तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, “अरे टकल्या, वर जा.”
24त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या बेचाळीस पोरांना फाडून टाकले.
25तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोमरोनाला माघारी गेला.
सध्या निवडलेले:
२ राजे 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.