२ राजे 3
3
इस्राएलाचा राजा यहोराम ह्याची कारकीर्द
1यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम शोमरोनात राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले.
2परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापाइतके केले नाही; कारण त्याच्या बापाने केलेला बआलमूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकला.
3तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून करवली त्यांचे त्याने अवलंबन केले; ती त्याने सोडली नाहीत.
मवाबावर मिळणार्या विजयाविषयी अलीशाचे भविष्य
4मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे.
5अहाब मेल्यावर मवाबाचा राजा इस्राएलाच्या राजावर उलटला.
6त्या वेळी यहोराम राजाने शोमरोनातून बाहेर निघून सर्व इस्राएलाची जमवाजमव केली.
7त्याने जाऊन यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला असा निरोप पाठवला की, “मवाबाचा राजा माझ्यावर उलटला आहे, तर त्याच्याशी लढायला आपण माझ्याबरोबर येता काय?” तो म्हणाला, “हो, मी येतो; आपण आणि मी एकच; माझे लोक ते आपले लोक; माझे घोडे ते आपले घोडे.”
8त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.”
9त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदाचा राजा आणि अदोमाचा राजा ह्यांनी कूच केले; त्यांनी वळसा घेऊन सात मजला केल्यानंतर सर्व सेना व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे ह्यांना प्यायला पाणी मिळेना.
10तेव्हा इस्राएलाचा राजा म्हणाला, “अरेरे! ह्या तिघा राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणूनच परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.”
11तेव्हा यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला प्रश्न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलाच्या राजाच्या सेवकांपैकी एकाने सांगितले, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलीशा येथे आहे.”
12यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते.” मग इस्राएलाचा राजा, यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याच्याकडे गेले.
13अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” इस्राएलाचा राजा त्याला म्हणाला, “नाही, नाही; ह्या तीन राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.”
14अलीशा म्हणाला, “ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ; येथे असलेला यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला मी मान देत नसतो तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते.
15आता एखादा वाजंत्री घेऊन या.” वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त अलीशावर आला.
16तो म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ह्या खोर्यात जिकडेतिकडे खळगे खणा.
17परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पाऊस तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल; आणि तुम्ही, तुमची पाठाळे आणि जनावरे पाणी पितील.
18परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे; तो मवाबी लोकांना तुमच्या हाती देईल.
19तेव्हा तुम्ही प्रत्येक तटबंदी नगराचा व प्रत्येक निवडक नगराचा विध्वंस करा; चांगला वृक्ष असेल तेवढा तोडा; सर्व पाण्याचे कूप बुजवून टाका व दगड टाकून सर्व उत्तम शेतीची नासाडी करा.”
20सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला.
21राजे एकत्र होऊन आपल्याशी लढाई करण्यासाठी येत आहेत हे मवाबी लोकांनी ऐकले तेव्हा जितके मवाबी लढाईसाठी कंबर बांधण्यास लायक होते तितके व त्यांहून अधिक वयाचे सगळे एकत्र होऊन सीमेवर उभे राहिले.
22दुसर्या दिवशी ते पहाटेस उठले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मवाबी लोकांना ते दुरून रक्तासारखे भासले.
23ते म्हणाले, “ते रक्तच आहे; त्या राजांचा नाश झाला आहे; त्यांनी एकमेकांना मारून टाकले आहे ह्यात संशय नाही. तर मवाब्यांनो, लूट करायला चला.”
24मवाबी इस्राएलाच्या छावणीनजीक आले तेव्हा इस्राएलांनी उठून त्यांना मार दिला; आणि ते त्यांच्यापुढून पळाले; इस्राएल त्यांना मारत मारत त्यांच्या देशात शिरले.
25त्यांनी नगरांचा विध्वंस केला; सर्व चांगल्या शेतांत प्रत्येक पुरुषाने दगड फेकले, त्यांनी ती दगडांनी भरून टाकली; पाण्याचे सर्व कूप बुजवले, सर्व चांगली झाडे तोडून टाकली; फक्त कीर-हरेसेथ येथे त्यांनी दगडांशिवाय काहीएक राहू दिले नाही; आणि गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला.
26युद्धात आपण अगदी जेर झालो असे मवाबाच्या राजाने पाहिले तेव्हा त्याने सातशे धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही.
27तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज ह्याला नेऊन तटावर त्याचा होम केला, ह्यावरून इस्राएलावर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.
सध्या निवडलेले:
२ राजे 3: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.