लूक 23
23
1नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूंना पिलाताकडे नेले. 2त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”
3तेव्हा पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”
4तेव्हा पिलात मुख्य याजकांकडे आणि जमावाकडे वळून म्हणाला, “या माणसामध्ये मला कोणताही दोष दिसत नाही.”
5तेव्हा ते अधिकच आग्रह करून म्हणाले, “पण हा मनुष्य सर्व यहूदीया प्रांतातील लोकांस त्याच्या शिकवणीद्वारे भडकावित आहे आणि गालीलापासून सुरुवात करून तो येथे आला आहे.”
6हे ऐकल्यावर पिलाताने विचारले, “तो गालीली आहे काय?” 7तो गालीली असल्याचे समजल्यावर, पिलाताने येशूंना हेरोद राजाकडे घेऊन जाण्यास सांगितले, कारण गालील प्रांत हेरोदाच्या अधिकारकक्षेत होता आणि स्वतः हेरोद त्यावेळी यरुशलेमात होता.
8येशूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे हेरोद आनंदित झाला. कारण येशूंविषयी त्याने पुष्कळ ऐकले होते आणि त्याने केलेला एखादा चमत्कार डोळ्यांनी पाहण्याची त्याची फार इच्छा होती. 9त्याने येशूंना अनेक प्रश्न विचारले, परंतु येशूंनी त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. 10इकडे मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक उभे राहून आवेशाने येशूंवर आरोप करीत राहिले. 11त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले. 12त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते.
13नंतर पिलाताने प्रमुख याजक, अधिकारी आणि लोक यांना एकत्र बोलावून म्हटले, 14“तुम्ही या मनुष्याला, तो लोकांना बंड करावयास चिथावीतो म्हणून माझ्याकडे आणले. मी त्याची तुमच्यासमोर कसून तपासणी केली आणि तो निर्दोष आहे, असे मला आढळून आले. 15हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही. 16म्हणून मी याला फटके मारतो आणि नंतर त्याला सोडून देतो.” 17कारण या सणात त्यांच्यासाठी त्याला एका गुन्हेगाराला सोडावे लागत असे.#23:17 काही मूळ प्रतींमध्ये समान अर्थाचे शब्द समाविष्ट केलेले आहेत. मत्त 27:15 आणि मार्क 15:6
18परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.” 19बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते.
20येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला 21पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!”
22तरीही आणखी एकदा तिसर्या खेपेस पिलाताने खुलासा विचारला, “या मनुष्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला क्रूसखांबावर खिळावे असा कोणताही दोष त्याच्यामध्ये मला आढळला नाही, मी त्याला फटके मारून सोडून देतो.”
23परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले, 24आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले. 25तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे, बंडाळी आणि खून करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना क्रूसावर खिळावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले.
येशूंना क्रूसावर खिळतात
26ते येशूंना घेऊन जात असताना, कुरेने गावचा रहिवासी शिमोन नावाचा एक मनुष्य रानातून परत येत होता. त्याला त्यांनी धरले व येशूंचा क्रूसखांब त्याच्यावर ठेवला व त्याला तो येशूंच्या मागोमाग वाहून नेण्यास भाग पाडले. 27येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्या स्त्रियाही होत्या. 28तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. 29कारण असे दिवस येत आहेत की, त्या दिवसात तुम्ही म्हणाल, ‘लेकरे न झालेल्या स्त्रिया, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने धन्य आहेत.’ ” 30त्यावेळी,
“ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!”
आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’#23:30 होशे 10:8
31कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?”
32येशूंबरोबर आणखी दोन माणसे, दोघेही अपराधी होते, त्यांनाही जिवे मारण्याकरिता नेण्यात आले. 33जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. 34तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.”#23:34 काही जुन्या प्रतींमध्ये हे वाक्य दिसत नाही. आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
35लोक उभे राहून पाहत होते आणि शासक त्यांची थट्टा करीत होते. ते म्हणत होते, “त्याने दुसर्यांचे तारण केले, तो परमेश्वराचा निवडलेला म्हणजे ख्रिस्त असेल तर त्याने स्वतःचा बचाव करावा.”
36सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला. 37ते त्याला म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.”
38त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते:
हा यहूद्यांचा राजा आहे.
39गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.”
40पण दुसर्या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस? 41आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही.”
42मग तो येशूंना म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.#23:42 काही मूळ प्रतींमध्ये आपल्या राजाधिकाराने याल.”
43येशूंनी त्याला उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
येशूंचा मृत्यू
44आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. 45सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. 46तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.”#23:46 स्तोत्र 31:5 हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
47काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” 48क्रूसावर खिळण्याचा प्रसंग पाहण्याकरिता आलेल्या जमावाने घडलेल्या घटना पाहिल्या, तेव्हा ते शोकाकुल होऊन छाती बडवित घरी परतले. 49परंतु जे सर्व येशूंना ओळखत होते, त्यामध्ये गालीलाहून त्यांच्यामागे आलेल्या अनेक स्त्रिया काही अंतरावर थांबल्या आणि या गोष्टी पाहत होत्या.
येशूंचे शरीर कबरेत ठेवतात
50यहूदीयातील अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून चांगला व नीतिमान होता. 51त्याने त्यांच्या या निर्णयाला आणि कारवाईला संमती दिली नव्हती. तो यहूदीयातील अरिमथिया नगरातून आला असून, तो स्वतः परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता. 52पिलाताकडे जाऊन त्याने येशूंचे शरीर मिळण्यासाठी विनंती केली. 53त्याने येशूंचे शरीर क्रूसावरून खाली घेतले आणि ते तागाच्या वस्त्रात गुंडाळून खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले, ज्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. 54हे सर्व संस्कार शब्बाथाची तयारी करण्याच्या दिवशी करण्यात आले.
55येशूंबरोबर गालीलाहून आलेल्या स्त्रियांनी मागोमाग येऊन ती कबर पाहिली आणि येशूंचे शरीर कबरेत कसे ठेवले हे पाहिले. 56नंतर त्या घरी गेल्या आणि त्यांनी मसाले आणि सुगंधी द्रव्ये तयार केली. परंतु यहूदी नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी शब्बाथाच्या दिवशी विसावा घेतला.
നിലവിൽ തിരഞ്ഞെടുത്തിരിക്കുന്നു:
लूक 23: MRCV
ഹൈലൈറ്റ് ചെയ്യുക
പങ്ക് വെക്കു
പകർത്തുക
നിങ്ങളുടെ എല്ലാ ഉപകരണങ്ങളിലും ഹൈലൈറ്റുകൾ സംരക്ഷിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ടോ? സൈൻ അപ്പ് ചെയ്യുക അല്ലെങ്കിൽ സൈൻ ഇൻ ചെയ്യുക
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.