Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

उत्पत्ती 40

40
कैद्यांच्या स्वप्नांचा योसेफाने सांगितलेला अर्थ
1ह्यानंतर असे झाले की, मिसराच्या राजाचा प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांनी आपला स्वामी मिसराचा राजा ह्याचा काही अपराध केला.
2प्यालेबरदारांचा नायक व आचार्‍यांचा नायक ह्या त्याच्या दोघा सरदारांवर फारो रागावला.
3तेव्हा त्याने त्यांना गारद्यांच्या सरदारांच्या वाड्यात कैदेत ठेवले; तेथेच योसेफही अटकेत होता.
4गारद्यांच्या सरदाराने योसेफाला त्यांच्या तैनातीस दिले; व त्याने त्यांची सेवा केली; तेथे ते काही काळ अटकेत राहिले.
5बंदिशाळेत पडलेले मिसरी राजाचे प्यालेबरदार व आचारी ह्या दोघांना एकाच रात्री त्यांना लागू पडतील अशाच अर्थाची स्वप्ने पडली.
6सकाळी योसेफ त्यांच्याकडे जाऊन पाहतो तेव्हा ते खिन्न दिसले.
7तेव्हा आपल्या धन्याच्या कारागृहात आपल्याबरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारांना त्याने विचारले, “आज तुमची तोंडे का उतरलेली दिसतात?”
8ते त्याला म्हणाले, “आम्हांला स्वप्ने पडली आहेत व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपापले स्वप्न मला सांगा.”
9प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले ते असे : स्वप्नात माझ्यासमोर एक द्राक्षवेल होता;
10त्या द्राक्षवेलाला तीन फाटे होते, त्याला कळ्या फुटून बहर आला व त्याच्या गुच्छांना द्राक्षे येऊन पिकली होती;
11आणि फारोचा प्याला माझ्या हातात होता; मी द्राक्षे घेऊन ती फारोच्या प्याल्यात पिळली व तो प्याला फारोच्या हाती दिला.”
12योसेफ त्याला म्हणाला, “ह्याचा अर्थ असा : ते तीन फाटे म्हणजे तीन दिवस;
13तीन दिवसांच्या आत फारो तुझे शीर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पूर्ववत नेमील आणि तू पूर्वीप्रमाणेच फारोचा प्यालेबरदार होऊन त्याच्या हाती प्याला देशील.
14मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि माझ्यावर कृपा करून फारोकडे माझी गोष्ट काढून ह्या घरातून माझी सुटका कर.
15कारण इब्र्यांच्या देशाहून मला चोरून आणले आहे; आणि येथेही ह्या बंदिखान्यात टाकण्याजोगे मी काहीएक केलेले नाही.”
16स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्‍यांचा नायक योसेफाला म्हणाला, “मलाही असे स्वप्न पडले की, पांढर्‍या रोट्यांच्या तीन टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या,
17आणि वरच्या टोपलीत फारोसाठी सर्व प्रकारची पक्वान्ने असून पक्षी माझ्या डोक्यावरील त्या टोपलीतले पदार्थ खात होते.”
18योसेफाने उत्तर दिले, “ह्याचा अर्थ असा : त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस;
19फारो तीन दिवसांच्या आत तुझे शीर वर करून उडवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”
20तिसर्‍या दिवशी फारोचा वाढदिवस आला तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरांना मेजवानी दिली, आणि त्याने आपल्या प्यालेबरदारांचा नायक व आचार्‍यांचा नायक ह्यांना पुढे आणले.
21त्याने प्यालेबरदारांच्या नायकाला त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमले, आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला;
22पण त्याने आचार्‍यांच्या नायकाला फाशी दिली. योसेफाने त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले.
23तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला.

Voafantina amin'izao fotoana izao:

उत्पत्ती 40: MARVBSI

Asongadina

Hizara

Dika mitovy

None

Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra