उत्पत्ती 39
39
योसेफ आणि पोटीफराची पत्नी
1इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता.
2परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे.
3परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले.
4योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली; योसेफ त्याची सेवा करू लागला; आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्वकाही त्याच्या ताब्यात दिले.
5आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्वकाही केले; तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिसर्याच्या घरादाराचे कल्याण केले; त्याचे घरदार व शेतीवाडी ह्या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला.
6त्याने आपले सर्वकाही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्यापलीकडे आपले काय आहे ह्याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता.
7त्यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, “माझ्यापाशी नीज.”
8पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे.
9ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”
10तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना.
11एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करायला घरात गेला, त्या वेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही माणूस तेथे घरात नव्हता.
12तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, “माझ्यापाशी नीज.” पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला.
13ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले,
14तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, “पाहा, आमची अब्रू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे; तो माझ्यापाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले.
15मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.”
16त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने ते वस्त्र आपल्याजवळ राखून ठेवले.
17तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की, “जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास माझ्याकडे आला होता.
18मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.”
19“आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले,” हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला.
20योसेफाच्या धन्याने त्याला धरले, आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदिशाळेत त्याला टाकले; तो त्या बंदिशाळेत राहिला.
21तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकार्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.
22बंदिशाळेच्या अधिकार्याने त्या बंदिखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले; आणि तेथे जे काही ते करत, ते करवून घेणारा तो असे.
23त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी.
Voafantina amin'izao fotoana izao:
उत्पत्ती 39: MARVBSI
Asongadina
Hizara
Dika mitovy
Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.