लूक 9
9
प्रेषितांना अधिकार
1नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला. 2देवाच्या राज्याची घोषणा करायला व रोग्यांना बरे करायला पाठवताना 3त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकर किंवा पैसे घेऊ नका. दोन दोन अंगरखे घेऊ नका. 4ज्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा. तेथून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा. 5जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.”
6ते निघून सर्वत्र शुभवर्तमान जाहीर करीत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले.
हेरोद संभ्रमात
7त्या वेळी घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी राज्यकर्त्या हेरोदने ऐकले आणि तो फार संभ्रमात पडला; कारण योहान मेलेल्यातून उठला आहे, असे कित्येक लोक म्हणत होते. 8आणखी काही लोक एलिया प्रकट झाला आहे, असे म्हणत होते व इतर काही लोक प्राचीन संदेष्ट्यांपैकी एखादा पुन्हा उठला आहे, असे म्हणत होते. 9हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला असताना ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण असावा?” म्हणून त्याला भेटण्याची तो संधी शोधू लागला.
पाच हजारांना भोजन
10प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला. 11हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले. त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता. ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता.
12दिवस उतरू लागला, तेव्हा बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकांना निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.”
13परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे ह्यांव्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही.” 14तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांचे गट करून त्यांना बसवा.”
15त्यांनी त्याप्रमाणे सर्वांना बसवले. 16त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. 17सर्व जण जेवून तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.
पेत्राची ग्वाही
18तो एकान्ती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?”
19त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा देणारा योहान, पण कित्येक म्हणतात, एलिया आणि आणखी काही लोक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांतील एखादा पुन्हा उठला आहे.”
20त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून मानता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा मसिहा.”
मरण व पुनरुत्थानाविषयी येशूचे भाकीत
21हे कोणाला कळता कामा नये, असा त्याने त्यांना निक्षून आदेश दिला. 22शिवाय त्याने त्यांना हेदेखील सांगितले की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, हे घडणे क्रमप्राप्त आहे.
आत्मत्यागाबद्दल आवाहन
23त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझे अनुसरण करू पाहत असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व दररोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. 24जो कोणी आपला जीव वाचवू पाहत असेल तो आपल्या जिवाला मुकेल. परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. 25जर माणसाने सगळे जग कमावले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? 26ज्याला माझी व माझ्या वचनांची लाज वाटते, त्याची लाज मनुष्याच्या पुत्राला तो स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या वैभवाने येईल तेव्हा वाटेल. 27मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, येथे उभे असणाऱ्यांत काही जण असे आहेत की, देवाचे राज्य पाहिल्याविना त्यांना मरण येणार नाही.”
येशूचे रूपांतर
28ह्या निवेदनानंतर सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन येशू प्रार्थना करायला डोंगरावर गेला. 29तो प्रार्थना करीत असता त्याच्या चेहऱ्याचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र डोळे दिपून टाकण्याइतके पांढरेशुभ्र झाले 30आणि काय आश्चर्य! अकस्मात मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत असता त्यांच्या दृष्टीस पडले. 31ते तेजोमय दिसले. यरुशलेममधील त्याच्या मृत्यूने येशू देवाची योजना कशी पूर्ण करणार होता, ह्याविषयी ते बोलत होते. 32पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते तरीही ते जागे राहिले होते म्हणून त्यांना येशूचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोघे पुरुष दिसले. 33ते दोघे येशूपासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, “गुरुवर्य, आपण येथेच असावे हे बरे. आम्ही तीन तंबू तयार करतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.” हे जे तो बोलला, त्याचे त्याला भान नव्हते.
34तो हे बोलत असता एक ढग उतरून त्यांच्यावर छाया करू लागला. ते मेघात शिरले तेव्हा शिष्य भयभीत झाले. 35मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा पुत्र, माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका!”
36ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला. मात्र शिष्य गप्प राहिले आणि जे काही त्यांनी पाहिले होते, त्यातले त्यांनी त्या दिवसांत कोणाला काहीच सांगितले नाही.
भूतग्रस्त मुलगा
37दुसऱ्या दिवशी येशू आणि त्याचे तीन शिष्य त्या डोंगरावरून खाली आल्यावर पुष्कळ लोक त्याला येऊन भेटले. 38तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी आपणाला विनंती करतो, माझ्या मुलाकडे कृपादृष्टी वळवा. हा माझा एकुलता एक आहे. 39हे बघा, एक आत्मा ह्याला धरतो तसा हा अचानक ओरडतो. तो ह्याला असा झटका देतो की, ह्याच्या तोंडाला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ क्लेश देतो व ह्याला सोडता सोडत नाही. 40त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.”
41येशूने म्हटले, “अहो विश्वासहीन व व़िकृत मनोवृत्तीच्या लोकांनो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू?” नंतर तो त्या माणसाला म्हणाला, “तुझ्या मुलाला इकडे आण.”
42तो जवळ येत आहे, इतक्यात भुताने त्याला आपटले व मूर्च्छित अवस्थेत टाकून दिले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला निघून जाण्याचा हुकूम सोडला आणि मुलाला बरे करून त्याच्या वडिलांजवळ परत दिले. 43अदेवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले!
स्वतःच्या मरणाविषयी येशूचे दुसरे भाकीत
बयेशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य व्यक्त करीत असता, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, 44“तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” 45परंतु हे वचन त्यांना समजले नाही. ते त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि ह्याविषयी त्याला विचारण्यास ते धजत नव्हते.
नम्रता व सहिष्णुता
46आपणांमध्ये मोठा कोण, ह्याविषयी शिष्यांमध्ये आपसात वाद सुरू झाला. 47येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका लहान मुलाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले. 48आणि त्यांना म्हटले, “जो कोणी ह्या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. तुम्हां सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.”
49योहानने म्हटले, “गुरुवर्य, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली कारण तो आपला अनुयायी नव्हता.”
50येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका. जो तुम्हांला विरोध करत नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.”
येशूचा स्वीकार न करणारे शोमरानी लोक
51वर घेतले जाण्याचा त्याचा समय जवळ आला, तेव्हा येशूने यरुशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने आपले तोंड तिकडे वळवले. 52त्याने आपणापुढे काही जण पाठवले. ते निघून त्याच्यासाठी तयारी करायला शोमरोनी लोकांच्या एका गावात गेले. 53परंतु तेथील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोख यरुशलेमकडे जाण्याचा होता. 54हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आदेश द्यावा, अशी आपली इच्छा आहे काय?”
55त्याने वळून त्यांना खडसावले. 56नंतर येशू व त्याचे शिष्य दुसऱ्या गावास गेले.
शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी
57ते वाटेने चालत असता एका माणसाने येशूला म्हटले, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्या मागे येईन.”
58तो त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.”
59त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये”, परंतु तो म्हणाला, “प्रभो, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.”
60तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.”
61आणखी एकाने म्हटले, “प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु प्रथम मला माझ्या कुटुंबीयांचा निरोप घेऊ द्या.”
62येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”
Pilihan Saat Ini:
लूक 9: MACLBSI
Sorotan
Berbagi
Salin
Ingin menyimpan sorotan di semua perangkat Anda? Daftar atau masuk
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.