लूक 10
10
सत्तर शिष्यांना मार्गदर्शन
1ह्यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता. तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले. 2त्याने त्यांना म्हटले, “पीक उदंड आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत ह्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करा. 3जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवीत आहे. 4थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. 5ज्या घरात जाल तेथे ‘ह्या घरास शांती असो’, असे प्रथम म्हणा. 6तेथे कोणी शांतिप्रिय असला, तर तुमची शांती त्याच्याठायी राहील, नसला तर तुमच्याकडे ती परत येईल. 7त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा कारण कामगाराला त्याचे वेतन मिळायला हवे. 8कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले, तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा. 9तेथे जे आजारी असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’ 10परंतु तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही, तर तेथील रस्त्यावर जाऊन असे म्हणा, 11‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झटकून टाकतो. तथापि हे जाणून घ्या की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’ 12मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम नगराला परमेश्वर अधिक दया दाखवील.
श्रद्धाहीन नगरे
13हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथ्सैदा, तुझीदेखील केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्यशाली कृत्ये घडली ती सोर व सिदोन ह्यांत घडली असती, तर त्यांनी अगोदरच गोणपाट नेसून व राखेत बसून पश्चात्ताप केला असता व त्यांच्या पापांपासून परावृत्त झाल्याचे दाखवून दिले असते. 14परंतु न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन या नगरांना परमेश्वर अधिक दया दाखवील. 15हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत चढविला जाशील काय? नाही. तुला अधोलोकापर्यंत खाली फेकले जाईल.”
16येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले, त्याचा अव्हेर करतो.”
व्यापक दृष्टिकोन
17काही काळानंतर ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभो, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.”
18त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला, हे मी पाहिले. 19पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूंच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हांला काहीही बाधणार नाही. 20तथापि भुते तुम्हांला वश होतात, ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, यात धन्यता माना.”
येशूने केलेले आभारप्रदर्शन
21त्याच घटकेस येशू पवित्र आत्म्यात उल्हसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत. होय पित्या, कारण असेच घडावे, अशी तुझी इच्छा होती.
22माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे. पुत्र कोण आहे, हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”
23त्यानंतर शिष्यांकडे वळून तो त्यांना खाजगीत म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहात, ते पाहणारे तुम्ही किती धन्य आहात! 24मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात, ते पाहायची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली; तरी ते पाहू शकले नाहीत आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकायची त्यांनी इच्छा बाळगली; तरी त्यांना ते ऐकायला मिळाले नाही.”
शाश्वत जीवनप्राप्ती
25एकदा पाहा, एक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “गुरुवर्य, काय केल्याने मला शाश्वत जीवन हे वतन मिळेल?”
26त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्याचा काय अर्थ लावतोस?”
27त्याने उत्तर दिले, “तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.”
28त्याने त्याला म्हटले, “बरोबर आहे, हेच कर म्हणजे तू जगशील.”
29परंतु आत्मसमर्थन करण्याच्या इच्छेने तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”
परोपकारी शोमरोनी माणसाचा दाखला
30येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमहून यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहाण केली. त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. 31एक याजक त्याच वाटेने जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून पुढे गेला. 33त्यानंतर एक शोमरोनी माणूस त्या वाटेने जात असता, तेथे आला आणि त्याला पाहून, त्याला त्याचा कळवळा आला. 34त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. 35दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीची नाणी काढून उतारशाळेच्या व्यवस्थापकाला देऊन म्हटले, ‘ह्याला सांभाळा, ह्यापेक्षा जो काही अधिक खर्च होईल तो मी परत आल्यावर तुम्हांला देईन.’
36तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?”
37तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”
मार्था आणि मरिया
38येशू आणि त्याचे शिष्य पुढे जात असता तो एका गावात आला. तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. 39तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणांजवळ त्याचे प्रबोधन ऐकत बसली होती. 40मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभो, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.”
41प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, 42परंतु थोड्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मरियेने अधिक चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही.”
प्रभूने शिकवलेली प्रार्थना
Pilihan Saat Ini:
लूक 10: MACLBSI
Sorotan
Berbagi
Salin
Ingin menyimpan sorotan di semua perangkat Anda? Daftar atau masuk
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.