मार्क 6
6
नासरेथ गावी येशूचा अव्हेर
1येशू तेथून स्वतःच्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. 2साबाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला. पुष्कळ लोक त्याचे प्रबोधन ऐकून थक्क झाले व म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे? आणि ह्याच्या हातून काय ही सामर्थ्यशाली कृत्ये घडतात? 3मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन ह्यांचा भाऊ, तो हा सुतार ना? ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे म्हणत त्यांनी त्याचा अव्हेर केला.
4येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या स्वतःच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या कुटुंबीयांत त्याचा सन्मान होत नसतो.”
5काही रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. ह्याशिवाय त्याला तेथे काही करता आले नाही. 6त्यांच्या अविश्वासाचे त्याला आश्चर्य वाटले. त्यानंतर तो प्रबोधन करीत गावोगावी फिरला.
बारा प्रेषितांची रवानगी
7बारा जणांना स्वतःच्या जवळ बोलावून त्यांना जोडीजोडीने पाठवताना येशूने त्यांना भुतांवर अधिकार दिला. 8त्याने त्यांना आदेश दिला, “प्रवासासाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका. भाकर, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. 9चपला घालून चाला, दुसरा अंगरखा घालू नका.” 10आणखी तो त्यांना म्हणाला, “जेथे तुमचे स्वागत केले जाईल, त्या घरी ते ठिकाण सोडेपर्यंत राहा. 11ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही व जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना त्यांना इशारा देण्याच्या उद्देशाने आपल्या तळपायांची धूळ तेथेच झटकून टाका.”
12ते तेथून निघाले व लोकांनी पापांपासून परावृत्त व्हावे, असा त्यांनी उपदेश केला. 13त्यांनी अनेक भुते काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरे केले.
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा शिरच्छेद
14हेरोद राजाने येशूविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा देणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे म्हणून तो महत्कृत्ये करत आहे.”
15तर काही लोक म्हणत, “हा एलिया आहे”; आणखी काही जण म्हणत, “हा संदेष्टा, म्हणजे पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक आहे.”
16हे ऐकून हेरोद म्हणाला, “ज्या योहानचा मी शिरच्छेद केला, तो मरणातून उठला आहे.” 17हेरोदचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते 18व योहान त्याला सांगत असे, “तू तुझ्या भावाची बायको ठेवावीस, हे धर्मशास्त्राला धरून नाही.”
19ह्यासाठी हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करायला पाहत होती. परंतु तिचे काही चालेना. 20योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे, हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐकायचा, तेव्हा फार अस्वस्थ व्हायचा, तरीही त्याचे म्हणणे ऐकायला त्याला आवडत असे.
21शेवटी हेरोदियाला एक संधी मिळाली. हेरोदने त्याच्या वाढदिवशी त्याचे सरकारी प्रधान, सैन्यातील सरदार व गालीलमधील प्रमुख नागरिक ह्यांना मेजवानी दिली. 22तेव्हा हेरोदियाच्या मुलीने स्वतः तेथे येऊन नृत्य करून हेरोद व त्याच्याबरोबर भोजनाला बसलेले पाहुणे ह्यांना खूष केले. त्या वेळी राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे, ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.” 23तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”
24तिने बाहेर जाऊन तिच्या आईला विचारले, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर.”
25तिने लगेच घाईघाईने राजाकडे येऊन म्हटले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे, अशी माझी इच्छा आहे.”
26राजा फारच खिन्न झाला. तरी पण वाहिलेल्या शपथेमुळे व भोजनाला बसलेल्या पाहुण्यांमुळे त्याला नाही म्हणवेना. 27राजाने लगेच त्याच्या रक्षकांतील एका शिपायास पाठवून योहानचे शिर आणण्याचा आदेश दिला. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला. 28शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले. 29हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून कबरीत नेऊन ठेवला.
बारा प्रेषितांचे परतणे
30प्रेषित येशूजवळ परत आले व त्यांनी जे काही केले व शिकवले, ते सर्व त्याला सांगितले. 31तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवायलादेखील सवड होईना म्हणून तो त्यांना म्हणाला, “चला, आपण एकान्त ठिकाणी जाऊ या, म्हणजे तेथे तुम्हांला थोडा विसावा घेता येईल.” 32तेंव्हा ते मचव्यातून एकान्त स्थळी गेले.
33पुष्कळ लोकांनी त्यांना निघताना पाहिले व लगेच त्यांना ओळखले. तेथल्या सर्व नगरांतून लोक त्वरेने पायीच निघाले व त्यांच्या आधी तिकडे पोहोचले. 34येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा विशाल समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी प्रबोधन करू लागला.
पाच हजारांना भोजन
35दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व आता दिवस मावळत आहे. 36लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”
37त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन चांदीच्या दोनशे नाण्यांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला देऊ?”
38तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, शिवाय दोन मासे.”
39त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. 40ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले, 41येशूने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढायला त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. 42सर्व जण जेवून तृप्त झाले. 43त्यानंतर त्यांनी भाकरीच्या व माशांच्या उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. 44भोजन घेणाऱ्या पुरुषांची संख्या पाच हजार होती.
येशूचे पाण्यावरून चालणे
45‘मी लोकसमुदायाला निरोप देतो. तुम्ही मचव्यातून सरोवरापलीकडे बेथसैदा येथे जा’, असे सांगून त्याने लगेच शिष्यांना पुढे पाठवले. 46लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. 47सायंकाळ झाली, तेव्हा तो मचवा सरोवरात होता व येशू एकटाच जमिनीवर होता. 48शिष्य वल्ही मारतामारता हैराण झालेले त्याने पाहिले, कारण वारा विरुद्ध दिशेने वाहत होता. भल्या पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा रोख होता. 49त्याला जलाशयावरून चालताना पाहून, हे भूत आहे, असे त्यांना वाटले व ते ओरडले. 50त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका.” 51तो त्यांच्याबरोबर मचव्यात चढला आणि वारा पडला. ते मनातल्या मनात खूपच आश्चर्यचकित झाले; 52कारण भाकरींविषयी त्यांना काही समजले नाही, अथवा खरे म्हणजे त्यांची अंतःकरणे कठीण झाली होती.
गनेसरेतमधील रोग्यांना आरोग्यदान
53त्यानंतर ते सरोवराच्या पलीकडे गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहोचले व तेथे त्यांनी मचवा बांधून ठेवला. 54ते मचव्यातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले. 55ते आसपासच्या परिसरात धावपळ करत फिरले व जेथे कोठे येशू आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे ते आजाऱ्यांना खाटेवर घालून आणू लागले. 56तो खेड्यापाड्यांत, नगरांत किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, ते रुग्णांना चौकात आणून ठेवत व “आपल्या वस्त्राच्या किनारीला तरी स्पर्श करू द्या”, अशी त्याला विनंती करत. जितक्यांनी त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तितके बरे झाले.
اکنون انتخاب شده:
मार्क 6: MACLBSI
هایلایت
به اشتراک گذاشتن
کپی
می خواهید نکات برجسته خود را در همه دستگاه های خود ذخیره کنید؟ برای ورودثبت نام کنید یا اگر ثبت نام کرده اید وارد شوید
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.