स्तोत्रसंहिता 59
59
शत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे; शौलाने माणसे पाठवून दाविदाला ठार मारण्याकरता त्याच्या घरावर पहारा ठेवला तेव्हा त्याने रचलेले मिक्ताम नावाचे स्तोत्र.
1हे माझ्या देवा, माझ्या वैर्यांपासून मला सोडव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव.
2दुष्कर्म करणार्यांपासून मला सोडव; घातकी मनुष्यांपासून माझा बचाव कर.
3पाहा, ते माझा जीव घ्यायला टपले आहेत; हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा दोष नसता दांडगे लोक माझ्याविरुद्ध एकत्र जमले आहेत.
4माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. मला साहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पाहा.
5हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा, तू सर्व राष्ट्रांची झडती घेण्यास जागृत हो; कोणाही दगेखोर दुष्टावर दया करू नकोस.
(सेला)
6संध्याकाळी ते माघारी येतात कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात.
7पाहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्गार काढतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवारीच आहेत; कारण, “ऐकतो कोण?” असे ते म्हणतात;
8परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील; तू सर्व राष्ट्रांचा उपहास करशील.
9हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी प्रतीक्षा करीन; कारण देवच माझा उंच गड आहे.
10माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.
11त्यांना जिवे मारू नकोस, मारलेस तर माझ्या लोकांना विसर पडेल; हे प्रभू, तू आमची ढाल आहेस; आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांना खाली पाड.
12त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखांतील शब्द, त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या ह्यांमुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत.
13क्रोधाने त्यांचा संहार कर; ते नाहीसे होईपर्यंत त्यांचा संहार कर; देव याकोबावर व पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सत्ताधारी आहे अशी लोकांची खातरी होवो.
(सेला)
14संध्याकाळी ते माघारी येतात, कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात.
15ते अन्नासाठी भटकत फिरतात; त्यांची तृप्ती झाली नाही तर सारी रात्र थांबून राहतात.
16मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन; कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस.
17हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन; कारण देव माझा उंच गड आहे, माझा देव दयामय आहे.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 59: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.