YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 58

58
दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; अल्तश्केथ (नष्ट करू नको) ह्या चालीवर गायचे, मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र.
1अहो सत्ताधीशांनो, तुम्ही यथार्थ न्याय करता काय? तुम्ही मनुष्यामनुष्यामध्ये चोख निवाडा करता काय?
2नाही, तुम्ही मनात दुष्कर्मे योजता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसक कृत्ये पसरता1
3मातेच्या उदरी असतानाच दुर्जन फितूर होतात; ते जन्मापासूनच असत्य बोलत बहकत जातात.
4त्यांच्या ठायी सर्पाच्या विषासारखे विष असते; जो बहिरा जोगी साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे ते आहेत;
5मांत्रिक कितीही निपुणतेने मंत्र घालू लागले, तरी तो साप त्यांचा शब्द ऐकत नाही.
6हे देवा, त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल; हे परमेश्वरा, तरुण सिंहांच्या दाढा पाडून टाक.
7वाहणार्‍या लोंढ्याप्रमाणे ते वाहून जावोत; तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत.
8सरपटताना विरघळत जाणार्‍या गोगलगाईसारखे, ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत.
9तुमच्या पातेल्यांना कांटेर्‍या जळणाची आच लागण्यापूर्वीच त्यातले कच्चे असो, शिजलेले असो, ते तो वावटळीने उडवून देईल.
10सूड घेतलेला पाहून नीतिमान हर्ष पावेल; दुष्टांच्या रक्तात तो आपले पाय धुईल,
11तेव्हा माणसे म्हणतील की, “नीतिमानास खचीत फलप्राप्ती होते, खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 58