YouVersion Logo
Search Icon

ओबद्या 1

1
अदोमाला नमवणे
1ओबद्याला झालेला दृष्टान्त : अदोमाविषयी प्रभू परमेश्वराने हे म्हटले : परमेश्वरापासून आम्ही हे वर्तमान ऐकले आहे; एक जासूद राष्ट्रांमध्ये पाठवला आहे; तो म्हणतो, “उठा, आपण त्यांच्याबरोबर लढायला जाऊ.”
2पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे; तुला फार तुच्छ मानतात.
3खडकाच्या कपारींत उच्च स्थानी वसणार्‍या, तू आपल्या मनात समजतोस की, “मला खाली जमिनीवर कोण पाडणार?” ह्या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे.
4तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे तार्‍यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो.
5तुझ्यावर चोर आले, रात्री लुटारू आले, तर त्यांना हवे तेवढेच ते घेतील, नाही काय? द्राक्षे खुडणारे तुझ्याकडे आले, तर ते सरवा नाही का ठेवणार? पण तुझी तर किती नासाडी झाली आहे!
6एसावाची मालमत्ता कशी धुंडाळून काढण्यात आली आहे! त्याचे गुप्त निधी कसे हुडकण्यात आले आहेत!
7तुझ्याबरोबर करारमदार केलेल्यांनी तुला सीमेवर लावून दिले आहे; तुझ्याबरोबर सल्ला केलेल्यांनी तुला फसवले आहे, ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझे अन्न खाणार्‍यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे; अदोमात समज मुळीच नाही.
8मी अदोमातून सुज्ञ पुरुष नाहीतसे करीन, एसावाच्या पहाडातून बुद्धी नाहीशी करीन, असे त्या काळी नाही का घडणार, असे परमेश्वर म्हणतो.
9अरे तेमाना, तुझे वीर कच खातील, म्हणजे प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पहाडातून सर्व नष्ट होतील.
10तू आपला भाऊ याकोब ह्याच्यावर गहजब केलास म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील, व तुला कायमचे नष्ट करतील.
11ज्या दिवशी तू अलग राहिलास, ज्या दिवशी परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेशीयांनी त्याच्या वेशीत शिरून यरुशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकल्या, त्या दिवशी तूही त्यांतला एक होतास.
12तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नकोस आणि यहूदाच्या वंशजांना नाशसमय प्राप्त झाला असता तुला आनंद वाटू देऊ नकोस; संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नकोस.
13माझ्या लोकांच्या विपत्काळी त्यांच्या वेशीत शिरू नकोस, त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहून संतोष मानू नकोस, त्यांच्या विपत्काळी त्यांच्या मालमत्तेस हात लावू नकोस.
14त्यांच्या पळून जाणार्‍यांना मारून टाकण्यासाठी चव्हाठ्यावर उभा राहू नकोस, संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यांना धरून देऊ नकोस.
15कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे; तू केलेस तसे तुला करतील; तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल.
16कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्यालात तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; ती पिऊन बरळतील आणि होती की नव्हती अशी होतील.
इस्राएलास मानास चढवणे
17पण निभावलेले सीयोन डोंगरावर राहतील; तो पवित्रस्थान असा होईल; याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल.
18याकोबाचे घराणे अग्नी होईल, योसेफाचे घराणे ज्वाला होईल व एसावाचे घराणे धसकट होईल; ते त्यांच्यात पेट घेऊन त्यांना खाऊन टाकतील, एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही; कारण परमेश्वर असे बोलला आहे.
19दक्षिणेतील लोक एसावाच्या पहाडाचा ताबा घेतील; तळवटी तले लोक पलिष्ट्यांवर सत्ता चालवतील; ते एफ्राइमाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र ताब्यात घेतील व बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.
20इस्राएलवंशजांच्या ह्या सैन्यातले बंदिवान झालेले लोक कनान्यांचे सारफथापर्यंतचे वतन ताब्यात घेतील आणि यरुशलेमेतून बंदिवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेतल्या नगरांचा ताबा घेतील.
21एसावाच्या पहाडाचा न्याय करायला उद्धारकर्ते सीयोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वराचे होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in