योना 1
1
योना परमेश्वरापासून दूर पळतो
1अमित्तयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,
2“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे.”
3पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला, तो याफोस गेला; तेथे त्याला तार्शीशास जाणारे जहाज आढळले; त्याने त्याचे प्रवासभाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शीशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.
4तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले.
5खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले; मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता.
6तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही.”
7त्यांनी एकमेकांना म्हटले, “चला, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.
8त्यांनी त्याला विचारले, “कोणामुळे हे संकट आमच्यावर आले सांग; तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?”
9तो त्यांना म्हणाला, “मी इब्री आहे; ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे.”
10तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली; ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस?” तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते.
11ते त्याला विचारू लागले की, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.
12तो त्यांना म्हणाला, “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”
13जहाज किनार्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मारमारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता.
14तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की ह्या माणसाच्या जिवामुळे आम्हांला मारू नकोस व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आमच्यावर आणू नकोस; कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करतोस.”
15मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळायचा राहिला.
16त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला; त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले.
17परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता; योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता.
Currently Selected:
योना 1: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.