मत्तय 27
27
रोमी सुभेदार पिलात ह्याच्यासमोर येशू
1प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली;
2आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले.
यहूदाचा मृत्यू
3तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला,
4“मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.”
5मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला.
6मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.”
7मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.
8ह्यामुळे त्या शेताला ‘रक्ताचे शेत’ असे आजपर्यंत म्हणतात.
9तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले; ते असे की, “‘आणि ज्याचे मोल इस्राएलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल, म्हणजे ते तीस रुपये, त्यांनी घेतले
10आणि परमेश्वराने’ मला ‘आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले.”’
येशूची चौकशी
11मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने त्याला म्हटले, “आपण म्हणता तसेच.”
12मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही.
13तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?”
14परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले.
15त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती.
16आणि त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता.
17म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?”
18कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते.
19तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.”
20इकडे मुख्य याजक व वडील ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले.
21सुभेदाराने त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.”
22पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
23तो म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.”
24ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”
25सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”
26तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले, व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले.
येशूला वधस्तंभावर खिळतात
27नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली.
28त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला;
29काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली.
30ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले.
31मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले.
32ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले.
33मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर
34त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
35त्याला वधस्तंभावर खिळल्यावर ‘त्यांनी चिठ्ठ्या टाकून’ त्याची ‘वस्त्रे वाटून घेतली;’ [जे संदेष्ट्याने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले; ते असे की, ‘त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या’].
36नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले.
37त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला; तो असा : “हा यहूद्यांचा राजा येशू आहे.”
38त्या वेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.
39आणि जवळून जाणारेयेणारे ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा करत होते की,
40“अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.”
41तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले,
42“त्याने दुसर्यांना वाचवले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
43‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.”
44जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
येशूचा मृत्यू
45मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.
46आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली, एली, लमा सबख्थनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
47तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला हाक मारतो.”
48मग त्यांच्यातून एकाने लगेचच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो ‘आंबेने’ भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला.’
49इतर म्हणाले, “असू दे, एलीया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू.”
50मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला.
51तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले;
52थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली;
53आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले.
54शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.
55तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या; त्या येशूची सेवा करीत गालीलाहून त्याच्यामागे आल्या होत्या.
56त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब व योसे ह्यांची आई मरीया, व जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या.
येशूची उत्तरक्रिया
57मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता.
58त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पितालाने ते देण्याची आज्ञा केली.
59योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले;
60ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.
61पण तेथे कबरेसमोर मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या बसल्या होत्या.
62दुसर्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले,
63“महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे.
64म्हणून तिसर्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य [रात्री] येऊन त्याला चोरून नेतील व ‘तो मेलेल्यांतून उठला आहे’ असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.”
65पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.”
66मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.
Currently Selected:
मत्तय 27: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.