मत्तय 28
28
येशूचे पुनरुत्थान
1शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या कबर पाहण्यास आल्या.
2तेव्हा पाहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला.
3त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते.
4त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.
5देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “तुम्ही भिऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात, हे मला ठाऊक आहे.
6तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पाहा.
7आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की, तो मेलेल्यांतून उठला आहे; पाहा, तो तुमच्याआधी गालीलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल; पाहा, मी तुम्हांला हे सांगितले आहे.”
8तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या.
9मग पाहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, “कल्याण असो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून नमन केले.
10तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका; जा माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलात जावे; तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”
11त्या जात असता, पाहा, पहारेकर्यांतील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले.
12तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की,
13“‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले,’ असे म्हणा;
14आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हांला निर्धास्त करू.”
15मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले; आणि ही जी गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे.
येशूचे गालीलात प्रेषितांना दर्शन
16इकडे अकरा शिष्य गालीलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले;
17आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला.
18तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.
19तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;
20जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”
Currently Selected:
मत्तय 28: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.