मत्तय 26
26
येशूला ठार मारण्याचा कट
1मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले,
2“तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.”
3तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला;
4आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे अशी त्यांनी मसलत केली.
5परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.”
बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग
6तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता,
7कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली.
8हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, “हा नाश कशाला?
9हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.”
10येशूने हे जाणून त्यांना म्हटले, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे.
11कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही.
12हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले हे माझ्या उत्तरकार्यासाठी केले.
13मी तुम्हांला खचीत सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील.”
यहूदाची फितुरी
14तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले,
15“मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’
16तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला.
शेवटले भोजन
17नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”
18त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.”’
19मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
20संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनास बसला;
21आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”
22तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभूजी, मी तर नाही ना?”
23त्याने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल.
24मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.”
25तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा ह्याने विचारले, “गुरूजी, मी तर नाही ना?” तो त्याला म्हणाला, “होय, तू म्हटले तसेच.”
26मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.”
27आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या.
28हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.
29मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.”
शिष्य आपल्याला सोडून जातील ह्याबाबत येशूचे भविष्य
30नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले.
31तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’
32परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.”
33पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.”
34येशूने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
35पेत्र त्याला म्हणाला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले.
गेथशेमाने बागेत येशू
36नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
37मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला.
38तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
39मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
40मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही?
41तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.”
42आणखी त्याने दुसर्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”
43मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते.
44नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसर्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली.
45आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.
46उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”
येशूला अटक
47तो बोलत आहे इतक्यात, पाहा, बारा जणांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता.
48त्याला धरून देणार्याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.”
49मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले.
50येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली.
51मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला.
52तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील.
53तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?
54पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?”
55त्याच वेळेस येशू लोकसमुदायांना म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरण्यास तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही.
56पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी
57मग येशूला अटक करणार्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले.
58पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आत जाऊन, शेवट काय होतो हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला.
59मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होते;
60आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे [खोटे साक्षी] येऊन म्हणाले की,
61“‘देवाचे मंदिर मोडण्यास व तीन दिवसांत ते बांधण्यास मी समर्थ आहे’ असे ह्याने म्हटले.”
62तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?”
63तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”’
64येशू त्याला म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही ‘मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले’ व ‘आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”’
65तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे; आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे.
66तुम्हांला काय वाटते?” त्यांनी उत्तर दिले की, “हा मरणदंडास पात्र आहे.”
67तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले,
68“अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?”
पेत्र येशूला नाकारतो
69इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता; तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.”
70तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.”
71मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथील लोकांना म्हटले, “हा नासोरी येशूबरोबर होता.”
72पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”
73नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर, तूही त्यांच्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते.”
74तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला.
75तेव्हा “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील” असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
Currently Selected:
मत्तय 26: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.