ईयोब 11
11
सोफर ईयोबावर दोषारोप लादतो
1मग सोफर नामाथी म्हणाला,
2“हा शब्दांचा पूर उत्तर दिल्यावाचून वाहू द्यावा काय? वाचाळ खरा ठरावा काय?
3तुझ्या वटवटीने लोकांची तोंडे बंद होतील काय? तू निंदा करीत असता तुला कोणी फजीत करणार नाही काय?
4तू म्हणतोस, ‘माझा सिद्धान्त शुद्ध आहे; देवाच्या दृष्टीने मी स्वच्छ आहे.’
5देव जर बोलता, तुझ्याविरुद्ध आपले तोंड उघडता,
6तो ज्ञानाचे रहस्य तुला निवेदन करता, आपले चातुर्य बहुगुणित आहे हे तुला तो दाखवता तर किती बरे होते! देव तुझ्या बहुत अपराधांकडे कानाडोळा करतो हे लक्षात आण.
7देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय?
8ते गगनाइतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय कळणार?
9त्याचे परिमाण म्हटले तर ते भूगोलाहून लांब व समुद्राहून रुंद आहे.
10भ्रमण करीत असता त्याने एखाद्याला पकडून अटकेत टाकले, आणि न्यायसभा भरवली, तर त्याचा हात कोण धरील?
11आचारशून्य मनुष्याला तो ओळखतो; विचार करावा न लागता त्याला दुष्टता दिसून येते.
12रानगाढवाचा मनुष्य बनेल तर अक्कलशून्य मनुष्याला समज प्राप्त होईल.
13आपले हृदय नीट करशील, देवाकडे आपले हात पसरशील,
14तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेर्यात अन्याय राहू देणार नाहीस,
15तर निश्चये तू आपले निष्कलंक मुख वर करशील; तू स्थिर होशील, निर्भय होशील;
16कारण तू आपले दुःख विसरशील; ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल;
17तुझे जीवित मध्यान्हसमयाहून तेजस्वी होईल; अंधकार असला तरी तो प्रभातेसारखा होईल.
18तुला उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू चोहोकडे पाहून निर्धास्त आराम करशील.
19तू झोपी जाशील तेव्हा तुला कोणी भिवविणार नाही; बहुत लोक तुझे आर्जव करतील.
20दुष्टांचे डोळे थकतील; त्यांना कोणतेही शरणस्थान राहणार नाही; प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल.”
Currently Selected:
ईयोब 11: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.