YouVersion Logo
Search Icon

ईयोब 10

10
आपल्या परिस्थितीविषयी ईयोबाचे गार्‍हाणे
1“माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे; मी आपले गार्‍हाणे एकसारखे चालू ठेवीन; माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन.
2मी देवाला म्हणेन, मला दोषी लेखू नकोस; तू माझ्याशी विरोध का करतोस हे मला सांग.
3तू मला छळतोस; आपल्या हातच्या घडलेल्या वस्तूस तुच्छ लेखून दुष्टांच्या मसलतीला प्रसन्न होतोस, हे तुला उचित वाटते काय?
4तुला चर्मचक्षू आहेत काय? तुझी दृष्टी मर्त्य मानवाच्या दृष्टीसारखी आहे काय?
5तुझे दिवस मर्त्य मानवाच्या दिवसासारखे, तुझी वर्षे मनुष्याच्या वर्षांसारखी आहेत;
6म्हणून तू माझा अधर्म शोधतोस व माझे पाप हुडकतोस काय?
7तुला तर ठाऊक आहेच, की मी दुष्ट नाही. तुझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.
8तुझ्या हातांनी मला घडवले आहे, त्यांनी सर्वतोपरी मला बनवले आहे, तरी तू माझा नाश करीत आहेस.
9तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण; तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय?
10तू मला दुधासारखे ओतून दह्यासारखे विरजवले नाहीस काय?
11त्वचा व मांस ह्यांचे पांघरूण तू मला घातलेस, अस्थी व स्नायू जोडून मला बनवलेस.
12तू मला जीवन दिलेस व माझ्यावर प्रसाद केलास, तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहिला.
13तरी तू आपला हा उद्देश मनात लपवून ठेवलास; तुझ्या मनात काय होते ते आता मला समजले;
14मी पाप केले तर ते ध्यानात ठेवून माझ्या अधर्माची तू मला माफी करणार नाहीस;
15मी दुष्ट झालो तर हायहाय करावी लागेल. मी नीतिमान झालो तरी लज्जेने व्याप्त होऊन व माझी विपत्ती पाहून मी आपले डोके वर करणार नाही.
16माझे डोके वर झाले की तू सिंहासारखा माझ्या पाठीस लागणार; तुझ्या अद्भुत शक्तीचा माझ्यावर पुन्हा पुन्हा प्रयोग करणार.
17तू माझ्याविरुद्ध आपले नवेनवे साक्षीदार आणणार; तू माझ्यावरचा आपला क्रोध वृद्धिंगत करणार; तू माझ्यावर सैन्यामागून सैन्य पाठवणार.
18तू मला मातेच्या उदरातून का बाहेर आणलेस? बाहेर आणले नसते तर मी प्राणास अंतरलो असतो, कोणाच्या दृष्टीस मी पडलो नसतो.
19मी जन्माला येऊन न आल्यासारखा झालो असतो; मी गर्भावस्थेतूनच कबरेत गेलो असतो;
20माझे दिवस थोडे नाहीत काय? तर मला सोड, माझ्यावरची आपली दृष्टी काढ. म्हणजे माझ्या मनाला थोडे चैन पडेल;
21मग जेथून परत येणे नाही अशा अंधाराच्या, मृत्यूच्या प्रदेशात मी जाईन;
22जेथे काळोख, निबिड अंधकार आहे, अशा मृत्युच्छायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन; तेथला प्रकाश अंधकारच होय.”

Currently Selected:

ईयोब 10: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in