YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 48

48
मवाबाविषयी भविष्य
1मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;
2मवाबकन्येची कीर्ती नाहीशी झाली आहे. हेशबोनात तिच्याविरुद्ध कट करीत आहेत : ते म्हणतात, ‘चला, आपण तिचे राष्ट्रत्व मोडून टाकू.’ हे मदमेना, तू सामसूम होशील; तुझ्यामागे तलवार लागेल.
3होरोनाईमाकडून ‘जुलूम! प्रचंड नाश!’ अशी आरोळी ऐकू येत आहे.
4मवाबाचा नाश झाला आहे; त्याच्या हीनदीन झालेल्या लोकांची आरोळी ऐकू येत आहे.
5ते रडत रडत लूहीथाचा चढाव चढत आहेत; होरोनाईमाच्या उतारावर नाश! नाश! अशी संकटाची आरोळी ऐकू येत आहे.
6पळा, आपला जीव वाचवा, वनातल्या झुडुपांसारखे व्हा.
7तुझी कर्मे व तुझे निधी ह्यांच्यावर तुझी भिस्त होती म्हणून तू हस्तगत होशील; कमोश आपले याजक व सरदार ह्यांच्यासह बंदिवान होऊन जाईल.
8प्रत्येक नगरावर लुटारू येईल; कोणतेही नगर निभावणार नाही; खोरे नाश पावेल; पठार उद्ध्वस्त होईल असे परमेश्वर बोलला आहे.
9मवाबास पंख द्या म्हणजे तो उडून निघून जाईल; त्याची नगरे उजाड होतील, त्यांत कोणी राहायचा नाही.
10जो परमेश्वराच्या कार्याची हयगय करतो तो शापित होवो; जो रक्तपातापासून आपली तलवार राखतो तो शापित होवो.
11मवाब लहानपणापासून सुखात आहे. स्थिर राहिल्यामुळे गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखा तो आहे; त्याला ह्या पात्रातून त्या पात्रात ओतले नाही, तो बंदिवान होऊन गेला नाही, म्हणून त्याची रुची तशीच कायम आहे; त्याच्या वासात काही फरक झालेला नाही.
12ह्यामुळे परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की द्राक्षारसपात्रांची उलथापालथ करणार्‍यांना मी त्याच्याकडे पाठवीन; ते त्याची उलथापालथ करतील, त्याच्या घागरी फोडून टाकतील.
13आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजीत झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजीत होईल.
14‘आम्ही वीर आहोत, युद्धाच्या कामी शूर आहोत,’ असे तुम्ही का म्हणता?
15मवाब ओसाड झाला आहे, त्याच्या नगरांवर लोक चढाई करून गेले आहेत, त्याचे निवडक तरुण वध पावण्यास खाली उतरून गेले आहेत, असे राजेश्वर म्हणतो; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर.
16मवाबावर अरिष्ट येऊन ठेपले आहे, त्याची विपत्ती त्वरा करत आहे.
17त्याच्या आसपास असणारे व त्याचे नाव जाणणारे तुम्ही सर्व त्याच्यासाठी शोक करा; म्हणा, ‘मजबूत वेत्र, वैभवी दंड कसा मोडला आहे!’
18दीबोननिवासी कन्ये, आपल्या वैभवापासून खाली उतर, रुक्ष भूमीवर बस; कारण मवाबाचा विध्वंस करणारा तुझ्यावर चाल करून आला आहे, त्याने तुझ्या दुर्गाचा विध्वंस केला आहे.
19अरोएराच्या रहिवासिनी, रस्त्यावर उभी राहून पाहा; पळून जाणार्‍यास व निभावलेलीस विचार की, ‘काय झाले आहे?’
20मवाब फजीत झाला; हायहाय करा, रडा; मवाब ओसाड झाला आहे, हे आर्णोनात सांगा.
21सपाट प्रदेशाला शासन झाले आहे; होलोन, याहस, मेफाथ,
22दीबोन, नबो, बेथ-दिबलाथाईम,
23किर्याथाईम, बेथ-गामूल, बेथ-मौन,
24करीयोथ, बसरा आणि मवाब देशातली दूर व जवळची नगरे ह्यांना शासन झाले आहे.
25परमेश्वर म्हणतो, मवाबाचे शृंग मोडले आहे, त्याचा हात मोडला आहे.
26त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारली आहे; मवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्यविषय होईल.
27इस्राएल तुझा हास्यविषय नव्हता का? तो चोरांमध्ये आढळला काय? जेव्हा जेव्हा तू त्याची गोष्ट काढावीस तेव्हा तेव्हा तू आपली मान हलवावीस.
28मवाबाच्या रहिवाशांनो, नगरे सोडून द्या व कड्यांतून वस्ती करा; कपारीच्या बाजूला कोटे करणार्‍या पारव्यासारखे व्हा.
29आम्ही मवाबाचा गर्व ऐकून आहोत, तो अति गर्विष्ठ आहे, त्याचा ताठा, त्याचा अहंकार, त्याचा अभिमान, त्याची उन्मत्तता आम्ही ऐकून आहोत.
30परमेश्वर म्हणतो, त्याचा क्रोध, त्याची पोकळ बढाई, मला ठाऊक आहे; ती व्यर्थ ठरली आहे.
31ह्यामुळे मी मवाबाविषयी हायहाय करीन; अवघ्या मवाबासाठी आक्रंदन करीन; कीर-हरेसच्या लोकांसाठी शोक करतील.
32हे सिब्मेच्या द्राक्षलते, तुझ्यासाठी याजेरच्या आक्रोशाहून अधिक आक्रोश करीन; तुझ्या फांद्या समुद्रा-पलीकडे गेल्या होत्या, याजेर सरोवरापर्यंत त्या पोहचल्या होत्या; तुझ्या ग्रीष्मऋतूतील फळांवर व द्राक्षांच्या हंगामावर लुटारू पडला आहे.
33फळबागेतून, मवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे; द्राक्षकुंडांत द्राक्षारस नाही असे मी केले आहे; हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडवणार नाही; हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडवणार्‍यांचा नसणार.
34हेशबोनाहून एलालेपर्यंत, याहसापर्यंत आरोळी होते, सोअरापासून होरानाईमापर्यंत, एग्लाथ-शलिशीयापर्यंत आरोळी होते; कारण निम्रीमाचे पाणी आटले आहे.
35परमेश्वर म्हणतो, तसेच मवाबातून उच्च स्थानी अर्पण वाहणारा, व आपल्या दैवतांना धूप दाखवणारा, नाहीसा होईल असे मी करीन.
36ह्यामुळे मवाबासाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे, कीर-हरेसच्या लोकांसाठी माझे हृदय वायुवाद्यांसारखे नाद करीत आहे; त्याने संपादिलेले विपुल धन लयास गेले आहे.
37प्रत्येक डोके भादरले आहे; प्रत्येक दाढी मुंडली आहे; सर्वांच्या हातांवर घाव आहेत, कंबरांना गोणपाट आहे.
38मवाबाच्या सर्व धाब्यांवर, त्याच्या सर्व चव्हाट्यांवर चोहोकडे शोक चालू आहे; कारण नापसंत पात्राप्रमाणे मी मवाबाचा फोडून चुरा केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
39तो कसा भंगला आहे! ते कसे हायहाय करीत आहेत! मवाबाने लाजून कशी आपली पाठ फिरवली आहे! मवाब आपल्या सर्व शेजार्‍यापाजार्‍यांना हास्य व विस्मय ह्यांचा विषय झाला आहे!”
40परमेश्वर म्हणतो, “पाहा, तो गरुडासारखा उडेल व मवाबावर आपले पंख पसरील.
41करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.
42मवाब नाश पावून राष्ट्ररूप राहणार नाही, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई केली आहे.
43हे मवाबनिवासी, भीती, गर्ता व पाश हे तुला प्राप्त झाले आहेत असे परमेश्वर म्हणतो.
44जो भीतीपासून निभावेल तो गर्तेत पडेल, जो गर्तेतून बाहेर येईल तो पाशात अडकेल; कारण मी त्याच्यावर म्हणजे मवाबावर समाचार घेण्याचे वर्ष आणत आहे, असे परमेश्वर म्हणतो.
45पळून जाणारे हेशबोनाच्या छायेत निर्बल होऊन राहत आहेत; कारण हेशबोनातून अग्नी, सीहोनातून ज्वाला निघून मवाबाच्या सीमा व दंगेखोरांची माथी खाऊन टाकत आहे.
46हे मवाबा, तू हायहाय करणार! कमोशाचे लोक नष्ट झाले आहेत! कारण तुझे पुत्र बंदिवान करून नेले आहेत, तुझ्या कन्या बंदिवान करून नेल्या आहेत.
47तरी पुढील काळी मी मवाबाचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो.” येथे मवाबाच्या शासनाचे कथन संपले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 48