YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 49

49
अम्मोन्यांविषयी भविष्य
1अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?
2ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.
3हे हेशबोना, हायहाय कर! कारण आय उजाड केलेले आहे; राब्बाच्या कन्यांनो, रडा! आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळा, शोक करा, आवारातून इकडून तिकडे धावा; कारण मिलकोम दैवत, त्याचे याजक व सरदार ह्यांच्यासह, बंदिवान होऊन जाईल.
4तू खोर्‍यांचा, आपल्या सुपीक खोर्‍यांचा का अभिमान बाळगतेस? अगे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू आपल्या निधींवर भिस्त ठेवून म्हणालीस, ‘माझ्यावर कोण चालून येणार?’
5प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, तुझ्या आसपास जे कोणी आहेत त्यांच्यातून मी तुझ्यावर दहशत आणतो; तुमच्यातील एकूणएकास हाकून लावतील, भटकणार्‍यांना एकत्र करायला कोणी राहणार नाही.
6तरी पुढे मी अम्मोन्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”
अदोमाविषयी भविष्य
7अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?
8ददानच्या रहिवाशांनो, पळा, फिरा, दडून राहा; त्याचा समाचार घेण्याची वेळ आली म्हणजे मी एसावावर नेमलेले अरिष्ट त्याच्यावर आणीन.
9द्राक्षे गोळा करणारे तुझ्याकडे आले म्हणजे ते काही सरवा राहू देणार नाहीत; रात्री चोर आले तर त्यांना हवे तितके मिळेतोवर ते नासधूस करतील.
10तसे मी एसावास उघडेबोडके केले आहे, मी त्याची गुप्तस्थाने उघडी केली आहेत, त्याला लपता येत नाही; त्याचा वंश, त्याचे भाऊबंद व त्याचे शेजारी नष्ट झाले आहेत, तो गत झाला आहे.
11तुझे अनाथ राहू दे; मी त्यांना जिवंत ठेवीन; तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवोत.”
12कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, न्यायाने पाहता ज्यांना पेला प्यायचा नव्हता त्यांना तो प्यावा लागेल; तर तू कोणतीही शिक्षा झाल्यावाचून राहशील काय? तू शिक्षा झाल्यावाचून राहणार नाहीस, तुला पेला प्यावाच लागेल.
13परमेश्वर म्हणतो, मी आपल्या जीविताची शपथ वाहिली आहे की बसरा विस्मय, निंदा, उजाडी व शाप ह्यांना पात्र होईल; त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”
14मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे; राष्ट्रांत जासूद पाठवला आहे; “तुम्ही सर्व एकत्र व्हा, तिच्यावर चढाई करा, युद्धास उभे राहा.”
15कारण पाहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे, मानवांमध्ये तुला तुच्छ केले आहे.
16जी तू कड्याच्या कपारीत राहतेस, टेकडीच्या माथ्याचा आश्रय करून बसतेस, त्या तुला तुझ्या विक्राळपणाने, तुझ्या मनाच्या गर्वाने फसवले आहे; तू आपले कोटे गरुडाप्रमाणे उंच ठिकाणी केले असले तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वर म्हणतो.
17“अदोम भयावह होईल; प्रत्येक येणाराजाणारा तिला पाहून विस्मय पावेल, तिच्या सर्व पीडा पाहून तिचा उपहास करील.
18परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्याजवळची गावे जशी उद्ध्वस्त झाली त्याप्रमाणे तेथे कोणी राहणार नाही; एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.
19पाहा, तो यार्देनेच्या घोर अरण्यामधून येणार्‍या सिंहाप्रमाणे त्या मजबूत वस्तीवर येईल; मी अदोमास त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन, व ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील?
20ह्यास्तव परमेश्वराने अदोमाविरुद्ध केलेला संकल्प व तेमानाच्या रहिवाशांविषयी केलेल्या योजना ऐका : ते त्यांना, कळपांतील लहानसहानांना नेतील; त्यांची वस्ती त्यांच्यामुळे खातरीने विस्मय पावेल.
21त्यांच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कापत आहे; आरोळी होत आहे, तिचा आवाज तांबड्या समुद्रात ऐकू येत आहे.
22पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्‍यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे होईल.”
दिमिष्काविषयी भविष्य
23दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.
24दिमिष्क नगरीचा धीर सुटला आहे; ती पळून जाण्यास तयार झाली आहे; दहशतीने तिला पछाडले आहे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे क्लेश व वेदना तिला लागल्या आहेत.
25प्रशंसनीय नगरी, माझ्या आवडीची नगरी लोक का सोडून गेले नाहीत?
26ह्यामुळे त्या दिवशी तिचे तरुण तिच्या चवाठ्यावर पडतील, सर्व वीर स्तब्ध होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
27मी दिमिष्क नगरीच्या तटात अग्नी पेटवीन, तो बेन-हदादाचे वाडे खाऊन टाकील.”
केदार व हासोराविषयी भविष्य
28केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!
29ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.
30हासोराच्या रहिवाशांनो, पळा, दूर भटका, दडून राहा, असे परमेश्वर म्हणतो; कारण बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने तुमच्याविरुद्ध संकल्प केला आहे, तुमच्याविरुद्ध त्याने योजना केली आहे.
31“उठा! स्वस्थ व बेफिकीर राहणार्‍या राष्ट्रावर चढाई करा, असे परमेश्वर म्हणतो; त्याला वेशी किंवा अडसर नाहीत, ते एकीकडे राहतात.
32त्यांचे उंट लुटले जातील, त्यांचे बहुत कळप लुटीस जातील. दाढीचे कोपरे छाटलेल्यांची दाही दिशांत मी दाणादाण करीन; व चोहोकडून त्यांच्यावर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो.
33हासोर हे कोल्ह्याचे वसतिस्थान होईल, कायमचे ओसाड होईल; तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.”
एलामाविषयी भविष्य
34यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या राज्याच्या आरंभी एलामाविषयी यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :
35“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य आधार जे एलामाचे धनुष्य ते मी मोडून टाकीन.
36एलामावर आकाशाच्या चारही भागांतून मी चार वारे सोडीन व त्यांना त्या चारही दिशांना विखरीन; ज्यात एलामाचे पांगलेले लोक गेले नाहीत असे एकही राष्ट्र सापडायचे नाही.
37एलामाचा घात करू पाहणार्‍या त्याच्या शत्रूंपुढे मी त्यांना घाबरे करीन; मी त्यांच्यावर अरिष्ट, माझा संतप्त क्रोध आणीन, असे परमेश्वर म्हणतो; मी त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.
38मी एलामात आपले सिंहासन मांडीन आणि तेथून राजा व सरदार ह्यांचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो.
39तरी पुढील काळी मी एलामाचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 49