YouVersion Logo
Search Icon

यशया 15

15
मवाबाविषयी देववाणी
1मवाबाविषयीची देववाणी : एका रात्रीत मवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले; एका रात्रीत मवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले.
2बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.
3आपल्या पेठांत ते गोणपाट नेसून आहेत; आपल्या धाब्यांवर व चौकांत ते सगळे आकांत करत आहेत, अश्रू ढाळत आहेत.
4हेशबोन व एलाले ही ओरडत आहेत, याहसापर्यंत त्यांचा आक्रोश ऐकू जात आहे; ह्यास्तव मवाबाचे हत्यारबंद लोक आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव घाबरा झाला आहे;
5माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत.
6निम्रीमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे; झाडपाला सुकून गेला आहे; हिरवळ नाहीशी झाली आहे.
7ह्यास्तव त्यांनी वाचवलेले व साठवलेले धन ते वाळुंजाच्या ओहळापलीकडे नेत आहेत.
8कारण मवाबाच्या प्रदेशात चोहोकडे आरडाओरड झाली आहे; त्यांचे आक्रंदन एग्लाइमापर्यंत, त्यांचा आक्रोश बैर-एलीमापर्यंत ऐकू जात आहे.
9दीमोनाचे जलप्रवाह रक्ताने भरले आहेत; आणि दीमोनावर मी आणखी अरिष्ट आणणार; मवाबाच्या वाचलेल्या लोकांवर व देशातील अवशिष्ट लोकांवर एक सिंह आणणार.

Currently Selected:

यशया 15: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in