YouVersion Logo
Search Icon

यशया 14

14
1कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.
2विदेशी लोक त्यांना नेऊन स्वस्थानी पोचवतील; आणि इस्राएलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यांना दासदासी करून ठेवील; ज्यांनी त्यांना बंदिवान करून नेले होते त्यांना ते बंदीत ठेवतील; असे ते आपणांस पिडणार्‍यांवर स्वामित्व करतील.
3ज्या दिवशी तुझी पीडा, चिंता व तुझ्यावर लादलेले कठीण दास्य ह्यांपासून परमेश्वर तुला आराम देईल,
4त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजासंबंधाने हे कवन तू म्हणशील : “पिडणारा कसा नाहीसा झाला! पिळून काढणारी नगरी कशी नष्ट झाली आहे!
5-6जो क्रोधाने लोकांचे सतत ताडन करीत असे, जो कोपाने अनिवार छळ करून राष्ट्रांवर सत्ता चालवत असे, तो दुर्जनांचा सोटा, अधिपतींचा दंड, परमेश्वराने मोडून टाकला आहे.
7सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे; लोक गाण्याचा गजर करीत आहेत.
8सुरूची झाडे व लबानोनावरील गंधसरू तुझ्यामुळे हर्षित होऊन म्हणतात, ‘तू पडलास तेव्हापासून आमच्यावर कुर्‍हाड चालवणारा कोणी येत नाही.’
9खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे; तो तुझ्यासाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे; राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या-त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे.
10ते सर्व उठून तुला म्हणतात, ‘तूही आमच्याप्रमाणे निर्बळ झाला आहेस काय? तू आमच्यासारखा बनला आहेस काय?’
11तुझा डामडौल, तुझ्या सारंग्यांचा नाद अधोलोकात उतरत आहे; तुझ्याखाली कृमींचे अंथरूण झाले आहे, आणि वरून तुला कीटकांचे पांघरूण झाले आहे.
12हे देदिप्यमान तार्‍या,1 प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास! राष्ट्रांना लोळवणार्‍या तुला धुळीत कसे टाकले!
13जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन;
14मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन;’
15त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकले आहे.
16जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापवली व राज्ये डळमळवली तो हाच का पुरुष?
17ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला, व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच का पुरुष?’
18राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत;
19पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे; वधलेले, तलवारीने विंधलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले ह्यांनी तू वेष्टला आहेस. पायांखाली तुडवलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस.
20त्यांच्याबरोबर तुला मूठमाती मिळणार नाही, कारण तू आपल्या देशाची नासधूस केली व आपल्या प्रजेचा वध केला; कुकर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही.
21वडिलांच्या दुष्कर्मास्तव त्याच्या पुत्रांसाठी वधस्थान सिद्ध करा, म्हणजे ते उदयास येऊन देश जिंकणार नाहीत, पृथ्वीचा भाग नगरांनी व्यापून टाकणार नाहीत.”
22“मी त्यांच्यावर उठेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आणि बाबेलचे नाव व अवशेष, त्यांचे पुत्रपौत्र ह्यांचा मी समूळ उच्छेद करीन, असे परमेश्वर म्हणतो.
23तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”
अश्शूराचा नाश होणार
24सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की, “मी कल्पिले तसे होईलच; मी योजले तसे घडेलच;
25मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायांखाली तुडवीन; तेव्हा त्याचे जूं त्यांच्यावरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल.”
26सर्व पृथ्वीविषयी योजलेला संकल्प हाच आहे; सर्व राष्ट्रांवर उगारलेला हात हाच आहे.
27सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल! त्याचा हात उगारलेला आहे तर तो कोणाच्याने मागे आणवेल?
पलेशेथाविषयी देववाणी
28आहाज राजा मरण पावला त्या वर्षी ही देववाणी प्राप्त झाली :
29“हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे म्हणून आनंद करू नकोस, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्या साप होईल.
30गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील.
31अगे वेशी, हायहाय कर; अगे नगरी, ओरड; हे पलेशेथा, तू सर्वस्वी वितळून जाशील; कारण उत्तरेकडून धूर येत आहे; त्याच्या सैन्यापैकी कोणी चुकून मागे राहणार नाही.”
32राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.”

Currently Selected:

यशया 14: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in