निर्गम 28
28
याजकांनी घालायची वस्त्रे
(निर्ग. 39:1-7)
1तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ह्यांना इस्राएल लोकांतून आपल्याजवळ आण.
2आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर.
3आणि जे ज्ञानी आहेत ते म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार करायला सांग; त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल.
4त्यांनी तयार करायची वस्त्रे ही : ऊरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदील व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावीत. एफोद 5त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड घ्यावे.
6सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करून घ्यावे.
7त्याच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात व त्याची दोन टोके जोडावीत.
8एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.
9मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांवर इस्राएलांच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावीत;
10त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसर्या रत्नावर कोरावीत.
11रत्नांवर कोरीव काम करणार्याच्या कसबाने मुद्रा कोरली जाते त्याप्रमाणे त्या दोन्ही रत्नांवर इस्राएलांच्या मुलांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवावीत.
12ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावीत, ती इस्राएल लोकांची स्मारकरत्ने होत, म्हणजे अहरोन त्यांची नावे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यांवर स्मरणार्थ वागवील.
13त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावीत.
14पीळ घातलेल्या दोरीसारख्या दोन साखळ्या शुद्ध सोन्याच्या कराव्यात आणि त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणांत बसवाव्यात.
ऊरपट
(निर्ग. 39:8-21)
15न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा; तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा.
16तो चौरस व दुहेरी असावा, त्याची लांबी व रुंदी एकेक वीत असावी.
17त्यात रत्ने जडवावीत. त्यात रत्नांच्या चार रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
18दुसर्या रांगेत पाचू, नीलकांत मणी व हिरा;
19तिसर्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
20आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावीत.
21इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.
22दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या ऊरपटावर लावाव्यात.
23ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात, त्या दोन्ही कड्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात.
24ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या ह्या दोन कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात.
25पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणांत घालून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढील भागी लावाव्यात.
26सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना म्हणजे एफोदाच्या आतल्या बाजूला असलेल्या काठावर लावाव्यात.
27आणि सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांना खालच्या बाजूला त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावाव्यात.
28त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने बांधाव्यात; ह्याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील, आणि ऊरपट एफोदावरून सरकणार नाही.
29अहरोन पवित्रस्थानी प्रवेश करील तेव्हा तो न्यायाच्या ऊरपटावर, म्हणजे आपल्या हृदयावर इस्राएलाच्या मुलांची नावे धारण करील व त्यायोगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील.
30तू न्यायाच्या ऊरपटात उरीम व थुम्मीम1 ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे; ह्या प्रकारे अहरोनाने इस्राएल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा.
इतर याजकीय वस्त्रे
(निर्ग. 39:22-31)
31एफोदाबरोबर घालायचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा.
32त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे, आणि त्याच्या सभोवती चिलखताच्या भोकाला असतो तसा विणलेला गोट असावा म्हणजे झगा फाटायचा नाही.
33त्याच्या खालच्या घेरात सभोवती निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे काढावीत आणि त्यांच्या दरम्यान सभोवती सोन्याची घुंगरे लावावीत,
34म्हणजे एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब, पुन्हा एक सोन्याचे घुंगरू व एक डाळिंब अशी झग्याच्या खालच्या घेरात सभोवती असावीत.
35सेवा करतेवेळी तो झगा अहरोनाने घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा तो घुंगरांचा आवाज ऐकू यावा, म्हणजे तो मरणार नाही.
36शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि जशी मुद्रा कोरतात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरावीत : ‘परमेश्वरासाठी पवित्र’
37आणि ती निळ्या फितीला अडकवून मंदिलाला लावावी, म्हणजे ती मंदिलावर राहील; ती मंदिलाच्या पुढील भागी लावलेली असावी.
38ती अहरोनाच्या कपाळावर असावी, ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक पवित्र करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी ते अर्पण करतील, त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; ती नित्य त्याच्या कपाळावर असावी; अशाने ती दाने परमेश्वराला मान्य ठरतील.
39चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा, तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
40अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे करावेत; त्यांच्या-साठी कमरबंद व फेटे करावेत, ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावीत.
41तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा. त्यांच्यावर संस्कार करावा, आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक ह्या नात्याने माझी सेवा करतील.
42त्यांच्यासाठी सणाचे चोळणे करावेत, म्हणजे त्यांचे अंग झाकलेले राहील; ते कंबरेपासून मांडीपर्यंत असावेत,
43आणि अहरोन अथवा त्याचे मुलगे दर्शनमंडपात2 प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी वेदीजवळ जातील, तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावेत. नाहीतर त्यांना दोष लागून ते मरतील; अहरोनाला व त्याच्या पश्चात त्याच्या वंशाला हा नियम निरंतरचा आहे.
Currently Selected:
निर्गम 28: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.