YouVersion Logo
Search Icon

निर्गम 27

27
होमवेदी
(निर्ग. 38:1-7)
1बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब व पाच हात रुंद अशी एक वेदी बनव; ती चौरस असावी. तिची उंची तीन हात असावी.
2तिच्या चार्‍ही कोपर्‍यांना चार शिंगे बनवावीत. ही शिंगे अंगचीच असावीत; ही वेदी पितळेने मढवावी.
3तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावीत, तिची सर्व उपकरणे पितळेची असावीत.
4तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी; चाळणीच्या चार्‍ही कोपर्‍यांसाठी पितळेच्या चार कड्या बनवाव्यात.
5ही चाळण वेदीच्या सभोवती कंगोर्‍याच्या खाली अशी लावावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीइतकी यावी.
6वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे कर व ते पितळेने मढव.
7ते दांडे कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलली जाईल तेव्हा तिच्या दोन्ही बाजूंना ते असतील.
8वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूस फळ्या बसवून बनवावी; पर्वतावर तुला दाखवल्याप्रमाणे ती करावी.
निवासमंडपाचे अंगण
(निर्ग. 38:9-20)
9निवासमंडपाला अंगण कर; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून त्यांची एक कनात कर; तिची लांबी एका बाजूला शंभर हात असावी;
10तिच्यासाठी वीस खांब करावेत आणि त्या खांबांसाठी पितळेच्या वीस उथळ्या कराव्यात; खांबांच्या आकड्या आणि त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या कराव्यात.
11त्याचप्रमाणे अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी; तिच्यासाठीही वीस खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या वीस उथळ्या असाव्यात आणि त्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या असाव्यात.
12अंगणाच्या रुंदीकडील भागी म्हणजे पश्‍चिमेकडे पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी. तिचे खांब दहा व उथळ्याही दहा असाव्यात.
13अंगणाची रुंदी दर्शनी बाजूस म्हणजे पूर्वेकडे पन्नास हात असावी;
14अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी; तिचे खांब तीन व उथळ्या तीन असाव्यात.
15फाटकाच्या दुसर्‍या बाजूला पंधरा हात कनात असून तिच्यासाठीही तीन खांब व तीन उथळ्या असाव्यात.
16अंगणाच्या फाटकासाठी एक पडदा बनवावा. तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा असून वेलबुट्टीदार असावा. तो वीस हात असून त्याला चार खांब व चार उथळ्या असाव्यात.
17अंगणाच्या सभोवतालचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडलेले असावेत. त्यांच्या आकड्या चांदीच्या आणि उथळ्या पितळेच्या असाव्यात.
18अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी सारखी पन्नास हात आणि त्याच्या कनातीची उंची पाच हात असावी; त्याची कनात कातलेल्या तलम सणाच्या सुताची असून त्याच्या खांबांच्या उथळ्या पितळेच्या असाव्यात.
19निवासमंडपातील सगळे साहित्य, त्याच्या सर्व मेखा आणि अंगणाच्या सर्व मेखा पितळेच्या असाव्यात.
दिव्याची काळजी
(लेवी. 24:1-4)
20तू इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे.
21साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in