YouVersion Logo
Search Icon

निर्गम 26

26
निवासमंडप
(निर्ग. 36:8-38)
1निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचे तयार करावेत व त्यांवर कुशल कारागिरांकडून करूब काढवावेत.
2एकेका पडद्याची लांबी अठ्ठावीस हात आणि रुंदी चार हात असावी; ते सर्व पडदे एकाच मापाचे असावेत.
3त्यांतले पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व दुसरे पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत.
4जेथे एक पडदा दुसर्‍याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी कर; तसेच दुसर्‍या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर.
5एका पडद्याला पन्नास बिरडी कर आणि दुसर्‍या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावीत.
6तसेच सोन्याचे पन्नास आकडे बनवावेत आणि ह्या आकड्यांनी पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप अखंड होईल.
7निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकर्‍यांच्या केसांचे पडदे करावेत; हे पडदे अकरा असावेत.
8एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात असावी; हे अकरा पडदे एकाच मापाचे असावेत.
9पाच पडदे एकत्र जोडावेत आणि सहा पडदे एकत्र जोडावेत; सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूने दुमडावा.
10अशा रीतीने जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी करावीत, दुसर्‍या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही तशीच पन्नास बिरडी करावीत.
11आणि पितळेचे पन्नास आकडे करावेत, ते बिरड्यांत घालून तंबू असा जोडावा की तो अखंड होईल.
12तंबूच्या पडद्यांचा लोंबत राहिलेला भाग म्हणजे उरलेला अर्धा पडदा निवासमंडपाच्या मागच्या बाजूला लोंबता सोडावा;
13आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर ह्या बाजूला व हातभर त्या बाजूला असे निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना लोंबते ठेवावेत.
14तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन आणि त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.
15मग निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या कराव्यात.
16प्रत्येक फळीची लांबी दहा हात व रुंदी दीड हात असावी.
17एक फळी दुसरीशी जोडण्यासाठी तिला दोन-दोन कुसे असावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात.
18निवासमंडपासाठी ज्या फळ्या तू करशील त्यांपैकी वीस फळ्या दक्षिण बाजूसाठी असाव्यात.
19ह्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या बनवाव्यात म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसांसाठी दोन-दोन उथळ्या असतील.
20तसेच निवासमंडपाच्या दुसर्‍या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात,
21त्यांच्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या बनवाव्यात म्हणजे एकेका फळीच्या खाली दोन-दोन उथळ्या असतील.
22निवासमंडपाच्या मागील म्हणजे पश्‍चिम बाजूसाठी सहा फळ्या कराव्यात,
23मागच्या बाजूला निवासमंडपाच्या कोपर्‍यांसाठी दोन फळ्या कराव्यात.
24ह्या दोन फळ्या खालच्या बाजूस सुट्या ठेवून वरच्या भागी एकेका कडीने जोडाव्यात. कोपर्‍याच्या दोन्ही फळ्या अशाच असाव्यात; दोन्ही कोपर्‍यांसाठी अशा फळ्या असाव्यात.
25आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या असाव्यात, म्हणजेच एकेका फळीच्या खाली दोन-दोन उथळ्या असाव्यात.
26बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करावेत; निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,
27आणि दुसर्‍या बाजूच्या फळ्यांसाठी पाच आणि त्याच्या पश्‍चिमेला म्हणजे मागच्या बाजूसाठी पाच अडसर बनवावेत.
28मधला अडसर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहचेल असा असावा.
29त्या फळ्या सोन्याने मढवाव्यात आणि अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवाव्यात, अडसरही सोन्याने मढवावेत.
30मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे निवासमंडप उभारावा.
31तसेच निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवावा व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढवावेत;
32हा पट सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या लाकडाच्या चार खांबांवर लटकवावा, त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात व ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत.
33अंतरपट आकड्यांत लटकवून त्याच्याआड आतल्या बाजूला साक्षपटाचा कोश ठेवावा; तुमच्याकरता हा अंतरपट पवित्रस्थान व परमपवित्रस्थान ही अलग करील.
34मग परमपवित्रस्थानात साक्षपटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
35आणि त्या अंतरपटाच्या बाहेर निवासमंडपाच्या उत्तर बाजूला मेज ठेवावे. दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
36तंबूच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनवावा.
37ह्या पडद्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत. ते सोन्याने मढवावेत. त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात आणि त्यांच्यासाठी पितळेच्या पाच उथळ्या ओताव्यात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in