YouVersion Logo
Search Icon

निर्गम 29

29
अहरोन आणि त्याचे मुलगे ह्यांच्या समर्पणाचा विधी
(लेवी. 8:1-36)
1त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे : एक गोर्‍हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावेत, 2आणि बेखमीर भाकर, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या आणि तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; ह्या सर्व सपिठाच्या असाव्यात.
3ह्या सर्व एका टोपलीत घाल. तो गोर्‍हा व ते दोन मेंढे ह्यांच्यासहित ती टोपली घेऊन ये.
4मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल;
5आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल, त्याला एफोद व ऊरपट बांध आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कंबरेला बांध;
6त्याच्या डोक्यात मंदील घाल आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव.
7नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर.
8मग त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल.
9आणि अहरोनाला व त्याच्या मुलांना कमरबंद बांध. त्यांच्या डोक्यांना फेटे बांध; ह्या प्रकारे ह्या निरंतरच्या विधीने त्यांना याजकपद प्राप्त व्हावे. ह्या प्रकारे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यावर संस्कार करावा.
10तो गोर्‍हा दर्शनमंडपासमोर आणावा. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत.
11मग परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ तो गोर्‍हा वधावा.
12गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन तू आपल्या बोटाने ते वेदीच्या शिंगांना लावावे. बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
13त्याच्या आतड्यांवर असलेली सगळी चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी ही सर्व घेऊन त्यांचा वेदीवर होम करावा.
14पण गोर्‍ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळून टाकावीत; हा पापार्पणाचा बली होय.
15मग एक मेंढा घ्यावा, आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत,
16आणि तो मेंढा वधावा व त्याचे रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावे.
17मग तो मेंढा कापून त्याचे तुकडे करावेत, आणि त्याची आतडी व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके ह्यांच्याबरोबर ठेवावे;
18त्यानंतर वेदीवर सबंध मेंढ्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
19नंतर दुसरा मेंढा घेऊन त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात ठेवावेत.
20मग तो मेंढा वधावा, आणि त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या शेंड्यांना आणि त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे वेदीवर सभोवती शिंपडावे.
21वेदीवरील रक्त आणि अभिषेकाचे तेल ह्यांतले थोडे घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रांवर, तसेच त्याच्याबरोबर त्याच्या मुलांवर व त्यांच्या वस्त्रांवरही शिंपडावे; अशाने तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र होतील.
22तो मेंढा संस्काराचा आहे म्हणून त्याची चरबी, त्याचे चरबीदार शेपूट, त्याच्या आतड्यांवरील चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुरदे व त्यांच्यावरील चरबी आणि उजवी मांडी, ही घे.
23त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी आणि एक चपाती घे;
24आणि हे सर्व अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेव आणि हे ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळ.
25मग त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन ते परमेश्वरासमोर मधुर सुगंध1 म्हणून वेदीवरील होमार्पणावर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पण केलेले हव्य होय.
26मग अहरोनाच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचे ऊर घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून ते परमेश्वरासमोर ओवाळ; तो तुझा हिस्सा आहे.
27आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या संस्कारासाठी वधलेल्या मेंढ्याचा ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ही तू पवित्र करावीस;
28इस्राएल लोकांकडून मिळणारा अहरोनाचा व त्याच्या मुलांचा हा निरंतरचा हक्क आहे, कारण हे समर्पित केलेले दान आहे; हे इस्राएलांकडून त्यांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेले दान होय.
29अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्या पश्‍चात त्याच्या मुलांसाठी असावीत, म्हणजे ह्या वस्त्रांनिशी त्यांचा अभिषेक होऊन त्यांच्यावर संस्कार व्हावा.
30त्या मुलांपैकी जो त्याच्या जागी याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ही वस्त्रे सात दिवस घालावीत.
31संस्कारासाठी वधलेला मेंढा घेऊन त्याचे मांस एखाद्या पवित्र जागी शिजव,
32मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दाराजवळ खावी;
33त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यांसाठी ज्या पदार्थांनी प्रायश्‍चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावेत, पण कोणा परक्याने ते खाऊ नयेत, कारण ते पदार्थ पवित्र आहेत.
34समर्पण केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले काही सकाळपर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे; ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे.
35मी तुला आज्ञा केली आहे त्या सर्व गोष्टींप्रमाणे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे कर; सात दिवसांपर्यंत त्यांच्यावर संस्कार कर.
36प्रायश्‍चित्तासाठी पापबली म्हणून एक गोर्‍हा दररोज बळी दे आणि वेदीसाठी प्रायश्‍चित्त करून ती शुद्ध कर. ती पवित्र करण्यासाठी तिला अभिषेक कर.
37सात दिवस वेदीसाठी प्रायश्‍चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल; ज्यांचा वेदीला स्पर्श होईल ते1 पवित्र ठरेल.
दररोज करायची होमार्पणे
(गण. 28:1-8)
38वेदीवर होम करायचा तो असा : प्रतिदिनी एकेक वर्षाच्या दोन कोकरांचा नित्य होम करावा.
39एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे;
40हातकुटीच्या पाव हिन2 तेलात एक दशमांश माप सपीठ मळून ते एका कोकराबरोबर अर्पावे आणि पाव हिन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे.
41दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे व त्याच्याबरोबरही सकाळच्याप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पण करावे; हे परमेश्वराला प्रिय असे सुवासिक हव्य होय.
42दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हांला भेटेन.
43ह्या स्थळी मी इस्राएल लोकांना भेट देईन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.
44दर्शनमंडप व वेदी मी पवित्र करीन; आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन.
45आणि मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.
46त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर काढले तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in