YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 18

18
याजक आणि लेवी ह्यांचे वाटे
1लेवीय याजकाला म्हणजे लेव्याच्या सर्व वंशाला इस्राएल लोकांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळणार नाही; परमेश्वराला अर्पायची हव्ये व त्यांच्या हक्काचे असेल ते त्यांनी खावे.
2त्यांच्या भाऊबंदांबरोबर त्यांना काही वतन मिळायचे नाही, पण परमेश्वराने त्यांना सांगितल्याप्रमाणे तो स्वत:च त्यांचे वतन आहे.
3गाईबैलांचा यज्ञ असो की शेरडामेंढरांचा यज्ञ असो, तो करणार्‍या लोकांकडून याजकाला हा हक्काचा वाटा मिळावा : म्हणजे फरा, दोन्ही गालफडे आणि कोथळा लोकांनी याजकाला द्यावेत.
4तुझे धान्य, नवा द्राक्षारस व तेल ह्यांचे प्रथमउत्पन्न आणि मेंढराची प्रथम कातरलेली लोकर तू त्याला द्यावी, 5कारण त्याने व त्याच्या वंशजांनी निरंतर परमेश्वराच्या नावाने सेवा करण्यास हजर राहावे म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुझ्या सर्व वंशांतून निवडून घेतले आहे.
6इस्राएल लोकांच्या एखाद्या नगरात राहणार्‍या कोणा लेव्याला परमेश्वराने निवडलेल्या स्थानी जाण्याची इच्छा झाली तर त्याने जावे.
7परमेश्वराची सेवा करणार्‍या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्या नावाने सेवा करावी.
8त्या सर्वांना अन्नाचा वाटा सारखा मिळावा; पितृधन विकून जे काही मिळेल ते त्याचे आहेच.
परराष्ट्रीयांच्या रीतीरिवाजांविरुद्ध ताकीद
9तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करायला शिकू नकोस.
10आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार,
11वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.
12कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.
13तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्त्विकतेने वाग.
14ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकुनमुहूर्त पाहणार्‍यांचे आणि चेटूक करणार्‍यांचे ऐकणारी आहेत; पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही.
मोशेसारखा दुसरा संदेष्टा देण्याचे परमेश्वराचे वचन
15तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका;
16होरेब डोंगराजवळ मंडळी जमली होती त्या दिवशी आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे तू विनंती केली होतीस त्याप्रमाणे होईल; तू म्हणालास, ‘माझा देव परमेश्वर ह्याची वाणी पुन्हा माझ्या कानी न पडो, मोठा अग्नी पुन्हा माझ्या दृष्टीस न पडो, पडला तर मी मरेन.’
17तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘हे लोक म्हणतात ते ठीक आहे.
18मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंदांतून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन; त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईन त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करील.
19तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन.
20पण जो संदेष्टा उन्मत्त होऊन जे बोलायची आज्ञा मी त्याला दिली नाही ते वचन माझ्या नावाने बोलेल अथवा जो अन्य देवांच्या नावाने बोलेल तो संदेष्टा प्राणास मुकेल.’
21‘अमुक वचन परमेश्वर बोलला नाही हे आम्ही कशावरून ओळखावे’ असा विचार तुझ्या मनात आला,
22तर कोणी संदेष्टा परमेश्वराच्या नावाने काही बोलला आणि त्याप्रमाणे घडले नाही किंवा प्रत्ययास आले नाही तर परमेश्वराचे ते बोलणे नव्हते असे समजावे; तो संदेष्टा उन्मत्त होऊन बोलला आहे; तू त्याची भीती बाळगू नकोस.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in