अनुवाद 19
19
शरणपुरे, प्राचीन चतु:सीमा
(गण. 35:9-28; यहो. 20:1-9)
1तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देश तुला देत आहे त्यांचा त्याने संहार केल्यावर तू त्यांच्या देशाचा ताबा घेशील आणि त्यांच्या नगरांत व घरांत वस्ती करशील, 2तेव्हा तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन करून देत आहे त्यात तुझ्यासाठी तीन नगरे राखून ठेव.
3मनुष्यवध करणार्या कोणालाही तेथे पळून जाता यावे म्हणून रस्ते तयार कर, आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन करून देत आहे त्या देशाचे तीन भाग कर.
4मनुष्यवध करणार्याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचवण्याची केलेली सोय अशी : पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजार्याला ठार मारले, तर त्याने तेथे जावे.
5उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजार्याबरोबर लाकडे तोडायला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुर्हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजार्याला लागली व तो मेला तर त्या माणसाने त्यांतल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा.
6अशी नगरे नसली तर त्याला फार दूर जावे लागेल आणि रक्तपाताबद्दल सूड घेणारा रागाच्या भरात त्याला गाठून मारून टाकील. खरे पाहता तो प्राणदंडास पात्र नाही, कारण पूर्वी त्याचे त्याच्याशी वैर नव्हते.
7म्हणून मी तुला आज्ञा करतो की, तू आपल्यासाठी तीन नगरे राखून ठेव.
8,9तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि त्याच्या मार्गांनी निरंतर चाल, अशी आज्ञा मी आज तुला देत आहे. ती सर्व तू काळजीपूर्वक पाळली व तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे त्याने तुझी देशमर्यादा वाढवली, आणि तुझ्या पूर्वजांना देऊ केलेला सगळा देश तुला दिला, तर ह्या तीन नगरांशिवाय आणखी तीन नगरे तू राखून ठेव;
10म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात निर्दोष मनुष्याचा रक्तपात होणार नाही आणि त्याच्या हत्येचा दोष तुला लागणार नाही.
11तथापि कोणी आपल्या शेजार्याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यांतल्या एका नगरात पळून गेला,
12तर त्याच्या गावच्या वडीलवर्गाने माणसे पाठवून तेथून त्याला आणवावे आणि त्याला मारून टाकण्यासाठी रक्तपाताचा सूड घेणार्याच्या हाती द्यावे.
13त्याच्यावर दयादृष्टी करू नकोस, पण निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाक, म्हणजे तुझे कल्याण होईल.
14तुला मिळणार्या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरवलेली आपल्या शेजार्याच्या सीमेची खूण सरकवू नकोस.
साक्षीदारांसंबंधी नियम
15एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्याविरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही; दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबीत व्हावा.
16एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेषबुद्धीने साक्ष दिली,
17तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित झाला असेल त्यांना परमेश्वरापुढे म्हणजे त्या दिवसांत असणारे याजक व न्यायाधीश ह्यांच्यापुढे उभे करावे.
18मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी करावी; आणि तो खोटा साक्षीदार असल्याचे व त्याने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचे आढळून आले,
19तर आपल्या बांधवाचे जे करण्याचे त्याने योजले असेल तेच तुम्ही त्याचे करावे; अशा रीतीने तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.
20हे ऐकून इतर लोकांना भीती वाटेल आणि येथून पुढे तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते करणार नाहीत.
21तू दयादृष्टी करू नयेस; जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा दंड करावा.
Currently Selected:
अनुवाद 19: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.