YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 17

17
1दोष अथवा व्यंग असलेला गोर्‍हा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर ह्याला अर्पू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.
2तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव परमेश्वर ह्याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करताना आढळून आले,
3म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले, 4आणि हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले तर त्याची कसून चौकशी कर; आणि ते खरे ठरून इस्राएल लोकांत असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली, 5तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल, त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत दगडमार कर.
6ज्याला जिवे मारायचे असेल त्याला दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे; एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये.
7ज्याला जिवे मारायचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावेत आणि मग इतर लोकांचे हात पडावेत. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.
8तुझ्या गावात रक्तपात किंवा मारहाण ह्या बाबतीत वाद उपस्थित होऊन त्याचा निर्णय करणे तुझ्या आवाक्याबाहेर असले तर लगेच तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानी जा, 9आणि लेवीय याजक व त्या वेळचा शास्ता ह्यांचा सल्ला घे. ते त्या वादाचा निर्णय सांगतील.
10परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुला सांगितलेल्या निर्णयाप्रमाणे तू निकाल दे, आणि ते ज्या काही सूचना तुला देतील त्या काळजीपूर्वक अंमलात आण.
11तुला ज्या सूचना ते देतील आणि जो निर्णय तुला सांगतील तो अंमलात आण; त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासून उजवीडावीकडे वळू नकोस.
12जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या सेवेस तेथे उपस्थित असणार्‍या याजकाचे किंवा न्यायाधीशाचे ऐकणार नाही तो मनुष्य प्राणास मुकावा; अशा प्रकारे इस्राएलातून तू ही दुष्टाई नाहीशी करावीस.
13हे ऐकून सर्व लोकांना भीती वाटेल व तेथून पुढे ते उन्मत्तपणा करायचे नाहीत.
राजासंबंधी सूचना
14तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की, आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा;
15तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपल्यावर राजा नेमावेस; आपल्या भाऊबंदांतून आपल्यावर राजा नेमावास; तुझ्या भाऊबंदांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नयेस.
16मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढवण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घ्यायला लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊ नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे.
17राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जाईल, तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये.
18तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वत:साठी उतरून घ्यावी;
19ती त्याच्याजवळ असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्यांप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगायला शिकेल.
20असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्या बाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही; तसेच तो व त्याचे वंशज इस्राएल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in