१ शमुवेल 30
30
दावीद अमालेक्यांचा पराभव करतो
1दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे, 2आणि तेथील स्त्रियांना व लहानमोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेले आहे; त्यांनी कोणाची कत्तल केली नाही, तरी त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले.
3दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले.
4तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही.
5दाविदाच्या दोन्ही स्त्रिया इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना पाडाव करून नेले होते.
6तेव्हा दावीद मोठ्या पेचात पडला; कारण लोक आपले पुत्र व कन्या ह्यांच्यासाठी शोकाकुल होऊन दाविदाला दगडमार करावा असे म्हणू लागले; पण दावीद आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला.
7दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले.
8दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला, “मी ह्या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांना गाठीन काय?” त्याने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील.”
9तेव्हा दावीद आपल्याबरोबरची सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहचला; तेथे काही लोक मागे पडले व तेथे राहिले.
10दावीद व चारशे लोक ह्यांनी पाठलाग चालवला; बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना.
11त्या लोकांना मैदानात एक मिसरी पुरुष आढळला; त्याला त्यांनी दाविदाकडे नेले; त्यांनी भाकर दिली ती त्याने खाल्ली आणि त्याला त्यांनी पाणी पाजले.
12आणखी त्याला अंजिराच्या ढेपेचा तुकडा व दोन खिसमिसांचे घड दिले; ते खाऊन तो ताजातवाना झाला, कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती की तो पाणी प्याला नव्हता.
13दाविदाने त्याला विचारले, “तू कोण, कोठला?” त्याने म्हटले, “मी एक मिसरी तरुण पुरुष असून एका अमालेकी मनुष्याचा दास आहे. आज तीन दिवस झाले, मी आजारी पडलो म्हणून माझा धनी मला सोडून गेला.
14आम्ही करेथ्यांच्या दक्षिण प्रांतावर, यहूदा प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण भागावर स्वारी केली आणि सिकलाग आग लावून जाळून टाकले.”
15दावीद त्याला म्हणाला, “त्या टोळीकडे मला नेशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “आपण मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी आपण देवाच्या नावाने आणभाक कराल तर मी आपल्याला त्या टोळीकडे नेईन.”
16तो त्याला तेथे घेऊन गेला तेव्हा त्याला असे दिसले की लोक जमिनीवर चोहोकडे पांगून खाऊनपिऊन मजा करीत आहेत; कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या प्रांतातून व यहूद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती.
17तेव्हा त्या दिवसाच्या संध्याकाळपासून दुसर्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत दावीद त्यांचा संहार करीत राहिला; त्यांच्यापैकी चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळून गेले होते त्यांखेरीज एकही मनुष्य वाचला नाही.
18अमालेकी लोकांनी पाडाव करून नेलेल्या सर्वांना दाविदाने सोडवले आणि आपल्या दोन्ही स्त्रियाही सोडवल्या.
19लहानथोर, कन्यापुत्र, लूट वगैरे जे काही ते घेऊन गेले होते त्यांतले त्यांना परत मिळाले नाही असे काहीच नव्हते; दाविदाने ते सर्व परत आणले.
20दाविदाने त्यांची शेरडेमेंढरे, गाढवे, बैल वगैरे सर्व लुटले; ही जनावरे लोक आपल्या जनावरांपुढे हाकून नेताना ते म्हणाले, “ही दाविदाची लूट आहे.”
21मग जे दोनशे पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यांना बसोर नाल्याजवळ तो ठेवून गेला होता, त्यांच्याजवळ दावीद गेला. तेव्हा ते त्याला व त्याच्याबरोबरच्या लोकांना भेटायला सामोरे आले; आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले.
22तेव्हा दाविदाबरोबर गेलेल्या लोकांपैकी जे वाईट व अधम लोक होते ते म्हणू लागले, “काही लोक आमच्याबरोबर आले नाहीत म्हणून आम्ही जी लूट आणली आहे तिच्यातली त्यांना आम्ही काहीएक देणार नाही; प्रत्येकाची बायकापोरे मात्र ज्याची त्याला देऊ, त्यांनी त्यांना घेऊन निघून जावे.”
23पण दावीद म्हणाला, “बांधवहो, परमेश्वराने जे आपल्याला दिले आहे त्याचे असे करू नका. त्याने आपले रक्षण केले आहे व जी टोळी आपल्यावर चाल करून आली होती ती आपल्या हातात दिली आहे.
24ह्या बाबतीत तुमचे कोण ऐकणार? जे लढाईला गेले त्यांना जेवढा वाटा मिळेल तेवढाच जे सामानसुमानाजवळ राहिले त्यांनाही मिळेल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.”
25त्या दिवसापासून पुढे हीच वहिवाट पडली; त्याने असाच नियमविधी इस्राएलांस आजपर्यंत लावून दिला आहे.
26दावीद सिकलाग येथे आला तेव्हा त्याने आपले मित्र यहूदाचे वडील ह्यांच्याकडे लुटीचा काही भाग पाठवून त्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हांला ही भेट पाठवली आहे”;
27बेथेल, दक्षिणेतील रामोथ, यत्तोर,
28अरोएर, सिफमोथ, एष्टमो,
29राखाल व यरहमेली येथले नगरवासी, केन्यांच्या नगरातले रहिवासी,
30हर्मा, कोराशान, अथाख,
31आणि हेब्रोन आदिकरून ज्या ज्या ठिकाणी दावीद आपल्या लोकांसह फिरत असे तेथील आपल्या मित्रांना त्याने लुटीतून भेटी पाठवल्या.
Currently Selected:
१ शमुवेल 30: MARVBSI
Highlight
Share
Compare
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.