१ शमुवेल 29
29
पलिष्टी दाविदावर विश्वास ठेवत नाहीत
1इकडे पलिष्ट्यांनी आपली सर्व सेना अफेकात एकत्र केली; इस्राएल लोकांनी इज्रेलात एका झर्याजवळ छावणी दिली होती.
2पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरशंभर व हजारहजार योद्ध्यांच्या पुढे चालले आणि सैन्याच्या पिछाडीस आखीशाबरोबर दावीदही आपल्या मनुष्यांच्या पुढे चालला.
3पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले, “ह्या इब्र्यांचे येथे काय काम?” तेव्हा आखीश पलिष्ट्यांच्या सरदारांना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल ह्याचा सेवक दावीद हा नव्हे काय? आज तो कैक दिवस किंबहुना कैक वर्षे माझ्याजवळ आहे : तो त्यांना सोडून माझ्याकडे आला तेव्हापासून आजपर्यंत मला त्याच्यात काही वावगे आढळले नाही.”
4पण पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; ते त्याला म्हणाले, “जे स्थळ तू त्याला दिले आहेस तेथे त्याला परत पाठवून दे; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर तो आमचा वैरी होईल; तो आपल्या स्वामीला दुसर्या कशाने प्रसन्न करणार बरे? ह्या लोकांची शिरे कापूनच की नाही? 5‘शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले,’ असे ज्याच्याविषयी लोक नाचून व गाऊन आळीपाळीने म्हणाले तोच हा दावीद ना?”
6तेव्हा आखीशाने दाविदाला बोलावून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू तर सात्त्विकपणाने वर्तला आहेस आणि सैन्यात मला तुझी वर्तणूक चांगली दिसून आली आहे; कारण जेव्हापासून तू माझ्याकडे आलास तेव्हापासून तुझ्या ठायी मला काही वाईट आढळून आले नाही; पण तू सरदारांच्या मनास काही येत नाहीस.
7तर आता तू सुखरूप परत जा, पलिष्ट्यांच्या सरदारांची इतराजी करून घेऊ नकोस.”
8दावीद आखीशास म्हणाला, “मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला आपल्या दासाच्या ठायी काय आढळले आहे की आपला स्वामीराजा ह्याच्या शत्रूंशी लढायला मी जाऊ नये?”
9आखीश दाविदाला म्हणाला, “मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस; तरी पलिष्ट्यांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईला जाऊ नयेस.
10तर आता तुझ्या धन्याचे चाकर जे तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासह पहाटेस ऊठ आणि उजाडताच मार्गस्थ हो.”
11दावीद व त्याचे लोक पहाटेस उठून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले; इकडे पलिष्टी इज्रेलावर चढाई करून गेले.
Currently Selected:
१ शमुवेल 29: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.