उत्पत्ती 18

18
तीन पाहुणे
1अब्राहाम मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ राहत असताना, मध्यान्हाच्या उन्हात आपल्या तंबूच्या दारापुढे बसला होता, तेव्हा याहवेहने त्याला दर्शन दिले. 2अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले.
3तो त्यांना म्हणाला, “माझ्या स्वामी, माझ्यावर आपली कृपा झाली असल्यास, माझ्या घरी न येता पुढे जाऊ नका. 4मी थोडे पाणी आणतो आणि तुम्ही आपले पाय धुऊन या झाडाखाली विसावा घ्या. 5तुम्हाला ताजेपणा यावा म्हणून थोडे अन्नही आणतो मग तुम्ही पुढील प्रवासास निघा; तुम्ही तुमच्या या सेवकाकडे आला आहात.”
“ठीक आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे कर.” त्यांनी उत्तर दिले.
6मग अब्राहाम धावत आपल्या तंबूत येऊन साराहला म्हणाला, “लवकर तीन सिआ#18:6 अंदाजे 16 कि.ग्रॅ. सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.”
7नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे गेला, त्यातील एक कोवळे व उत्तम वासरू त्याने निवडले आणि ते लवकर बनवावे म्हणून एका नोकराकडे दिले. 8मग त्याने दूध, दही आणि वासराचे मांस घेतले, जे त्याने बनविले होते आणि ते त्यांच्यासमोर ठेवले; आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
9त्यांनी विचारले, “तुझी पत्नी, साराह कुठे आहे?”
अब्राहामाने उत्तर दिले, “ती तंबूत आहे.”
10मग त्यापैकी एकजण म्हणाला, “पुढील वर्षी मी तुझ्याकडे निश्चित वेळेत परत येईन, तेव्हा तुझी पत्नी साराहला एक पुत्र होईल.”
त्याच्यामागे, तंबूच्या दारातून साराह हे ऐकत होती. 11आता अब्राहाम व साराह दोघेही खूप वृद्ध झाली होती. साराहला मुले होण्याचा काळ केव्हाच निघून गेला होता; 12म्हणून साराह स्वतःशीच हसली व विचार करू लागली, “मी झिजून गेले आहे आणि माझा स्वामीही वृद्ध असताना, आता मला हा आनंद मिळेल काय?”
13तेवढ्यात याहवेहने अब्राहामाला विचारले, “ ‘माझ्यासारख्या वृद्धेला खरेच मूल होईल काय?’ असे म्हणत साराह का हसली? 14याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”
15साराह घाबरली, म्हणून ती खोटे बोलत म्हणाली, “मी हसले नाही.”
परंतु ते म्हणाले, “होय, तू हसलीस.”
सदोम शहरासाठी अब्राहामाची मध्यस्थी
16जेव्हा ते पुरुष पुढील प्रवासास जाण्यास उठले आणि त्यांनी खाली सदोमाच्या दिशेने पाहिले. अब्राहाम त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर थोडी वाट चालून गेला. 17मग याहवेह म्हणाले, “अब्राहामापासून मी माझा संकल्प गुप्त ठेवावा काय? 18कारण खात्रीने अब्राहाम एक महान व बलाढ्य राष्ट्र होईल आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित#18:18 किंवा त्याचे नाव आशीर्वाद म्हणून वापरले जाईल होतील. 19कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”
20मग याहवेहने म्हटले, “सदोम आणि गमोरा विरुद्ध आक्रोश खूप वाढला आहे आणि त्यांचे पाप गंभीर आहे. 21मी खाली जाऊन बघेन, मग त्यांनी जे केले आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आक्रोशाएवढे वाईट आहे की नाही हे मला समजेल.”
22त्याच्याबरोबर असलेले पुरुष सदोमाच्या दिशेने गेले, पण अब्राहाम याहवेहपुढे उभा राहिला. 23अब्राहाम त्यांच्याजवळ गेला आणि विचारले: “तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचा सुद्धा नाश करणार काय? 24जर त्या शहरात पन्नास नीतिमान लोक आढळले तरी त्यांचा तुम्ही नाश करणार आणि त्यात असलेल्या नीतिमान लोकांसाठी तुम्ही त्यांची गय करणार नाही काय? 25ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”
26याहवेहने उत्तर दिले, “त्या सदोम शहरात मला जर पन्नास नीतिमान लोक आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सर्व शहराची गय करेन.”
27मग अब्राहाम पुन्हा म्हणाला, “मी धूळ आणि राख असून, मी प्रभूशी बोलण्याचे धैर्य केले आहे, 28जर नीतिमानांची संख्या पाच कमी पन्नास असली तर काय? पाच लोक कमी आहेत म्हणून तुम्ही त्या संपूर्ण शहराचा नाश करणार काय?”
याहवेहने उत्तर दिले “मला तिथे पंचेचाळीस भेटले, तरी मी त्याचा नाश करणार नाही.”
29अब्राहाम पुन्हा याहवेहला म्हणाला, “तिथे फक्त चाळीस असले तर काय?”
याहवेहने उत्तर दिले, “त्या चाळिसांसाठी, मी नाश करणार नाही.”
30मग तो म्हणाला, “प्रभूला राग येऊ नये, पण मला बोलू द्यावे. फक्त तीसच मिळाले तर?”
याहवेहने उत्तर दिले, “तिथे तीस सापडले, तरी मी नाश करणार नाही.”
31मग अब्राहाम म्हणाला, “मी प्रभूशी बोलण्याचे खूप धैर्य केले आहे, तिथे जर वीसच नीतिमान लोक असले तर?”
त्यांनी म्हटले, “त्या विसांसाठी मी त्यांचा नाश करणार नाही.”
32मग तो म्हणाला, “प्रभूला राग न येवो, पण मला एकदाच बोलू द्यावे. तिथे फक्त दहाच सापडले तर?”
याहवेहने उत्तर दिले, “त्या दहांच्यासाठी मी त्याचा नाश करणार नाही.”
33जेव्हा याहवेहने अब्राहामाशी आपले बोलणे संपविले, ते निघून गेले आणि अब्राहाम घरी परतला.

Qhakambisa

Dlulisela

Kopisha

None

Ufuna ukuthi okuvelele kwakho kugcinwe kuwo wonke amadivayisi akho? Bhalisa noma ngena ngemvume