योहान 20

20
रिकामी कबर
1आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरीजवळ गेली आणि कबरीवरून शिळा बाजूला सारलेली आहे, असे तिने पाहिले. 2शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत जाऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरीतून नेले व त्याला कुठे ठेवले, हे आम्हांला ठाऊक नाही.”
3पेत्र व तो दुसरा शिष्य कबरीकडे जायला निघाले. 4ते दोघे धावत होते, मात्र तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा अधिक वेगाने धावत पुढे गेला व कबरीजवळ प्रथम पोहोचला 5आणि ओणवा होताच त्याला तागाचे कापड पडलेले दिसले, परंतु तो आत गेला नाही. 6मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहोचला व कबरीत शिरला. 7तागाचे कापड व जो रुमाल येशूच्या डोक्याला होता तो तागाच्या कापडाजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे, असे त्याला दिसले. 8तेव्हा जो दुसरा शिष्य प्रथम कबरीजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. 9‘त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक आहे’, हा धर्मशास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. 10त्यानंतर ते शिष्य आपल्या घरी परत गेले.
येशूचे मरियेला दर्शन
11इकडे मरिया कबरीजवळ रडत उभी राहिली होती. रडतारडता तिने वाकून कबरीत पाहिले. 12जेथे येशूचे शरीर ठेवले होते, तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व दुसरा पायथ्याशी बसलेले तिला दिसले. 13त्यांनी तिला विचारले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कुठे ठेवले ते मला ठाऊक नाही!”
14असे बोलून ती पाठमोरी फिरली तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे, हे तिने ओळखले नाही. 15येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाला शोधत आहेस?” तो माळी आहे, असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस, तर त्याला कुठे ठेवलेस, हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”
16येशूने तिला म्हटले, “मरिये!” ती वळून त्याला म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे हिब्रू भाषेत गुरुवर्य)
17येशूने तिला म्हटले, “मला स्पर्श करू नकोस, कारण मी अजून पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जात आहे.”
18मरिया मग्दालिया गेली व तिने प्रभूला पाहिल्याचे व त्याने तिला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले.
येशूचे प्रेषितांना दर्शन
19त्याच दिवशी, म्हणजे रविवारी संध्याकाळी, यहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंद करून एकत्र जमलेल्या त्याच्या शिष्यांमध्ये येशू आला व मध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो!” 20असे बोलून त्याने त्याचे हात व त्याची कूस त्यांना दाखवली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. 21येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो. जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मीही तुम्हांला पाठवतो.” 22असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. 23ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्यांची क्षमा केली जाईल आणि ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा करणार नाही त्यांची क्षमा केली जाणार नाही.”
येशूचे थोमाला दर्शन
24येशू आला तेव्हा बारा जणांतील एक ज्याला दिदुम म्हणजे जुळा म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. 25म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले!” परंतु त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांतील व्रण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी माझे बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत माझा हात घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.”
26मग एका आठवड्यानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा खोलीत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो!” 27नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा. तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन राहू नकोस तर विश्वास ठेवणारा हो.”
28थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”
29येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस, पाहिल्यावाचून विश्वास ठेवतात ते धन्य!”
ह्या शुभवर्तमानाचा हेतू
30ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. 31परंतु हे जे लिहिले आहे ते अशाकरता की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्‍वासाद्वारे त्याच्या नावात तुम्हांला जीवन प्राप्त व्हावे.

Поточний вибір:

योहान 20: MACLBSI

Позначайте

Поділитись

Копіювати

None

Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть