योहान 17

17
आपल्या शिष्यांकरिता येशूची प्रार्थना
1ह्या गोष्टी बोलल्यावर येशू आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू तुझ्या पुत्राचा गौरव कर. 2तू त्याला जे दिले आहेत त्या सर्वांना त्याने शाश्वत जीवन द्यावे म्हणून तू सर्व मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहेस. 3शाश्वत जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. 4जे कार्य तू मला करायला दिलेस, ते पुरे करून मी तुझा पृथ्वीवर गौरव केला आहे. 5हे माझ्या पित्या, जगाच्या निर्मितीपूर्वी तुझ्याबरोबर माझे जे वैभव होते, तेच वैभव तुझ्या उपस्थितीत मला आता दे.
6जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस. त्यांनी तुझे वचन पाळले आहे. 7आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस, ते सर्व तुझ्याकडून आले आहे. 8जी वचने तू मला दिलीस, ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्याकडून आलो, हे ते ओळखतात आणि तू मला पाठवले आहेस, असा ते विश्वास ठेवतात.
9त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. 10जे माझे आहेत ते सर्व तुझे आहेत आणि जे तुझे आहेत ते माझे आहेत आणि त्यांच्याद्वारे माझा गौरव झाला आहे. 11ह्यापुढे मी जगात नाही परंतु ते मात्र ह्या जगात आहेत. आता मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे म्हणून, तू मला दिलेल्या तुझ्या नावाने त्यांचे संरक्षण कर. 12जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो, तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावाने मी त्यांचे संरक्षण केले. मी त्यांचा सांभाळ केला. ज्याचा विनाश अटळ आहे त्याच्याशिवाय त्यांच्यामधील कोणीही हरवला नाही. धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. 13आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी ह्या गोष्टी जगात बोलत आहे. 14मी त्यांना तुझा संदेश कळवला आहे. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. 15तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करत नाही, तर तू त्यांचे दुष्टापासून संरक्षण करावे अशी विनंती करतो. 16जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. 17सत्यात तू त्यांना तुझ्याकरता समर्पित करून घे. तुझे वचन हेच सत्य आहे. 18जसे तू मला जगात पाठवलेस तसेच मी त्यांना जगात पाठवले 19आणि त्यांनीही तुझ्याकरता समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला तुझ्यापुढे समर्पित करतो.
20मी केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांनी सांगितलेल्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करत आहे की, 21त्या सर्वांनी एक व्हावे. पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे. म्हणजे तू मला पाठवले आहेस, असा विश्वास जगाने ठेवावा. 22जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे म्हणून तू मला दिलेल्या वैभवात मी त्यांना सहभागी केले आहे. 23त्यांनी पूर्णपणे एक व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आहेस आणि तू जशी माझ्यावर प्रीती करतोस तशी त्यांच्यावरही प्रीती करतोस.
24जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस म्हणून हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे, तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की, जे माझे वैभव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. 25हे नीतिमान पित्या, जग तुला ओळखत नाही. मी तुला ओळखतो आणि तू मला पाठवलेस, हे त्यांना ठाऊक आहे. 26मी तुझे नाव त्यांना सांगितले आहे आणि पुढेही सांगत राहीन. त्यामुळे, जी प्रीती तू माझ्यावर करतोस, ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि मीसुद्धा त्यांच्यामध्ये असावे.”

Поточний вибір:

योहान 17: MACLBSI

Позначайте

Поділитись

Копіювати

None

Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть