प्रेषितांचे कार्य प्रस्तावना

प्रस्तावना
प्रेषितांचे कार्य हे पुस्तक म्हणजे लूकरचित शुभवर्तमानाचा जणू पुढील भाग आहे. येशूच्या सुरुवातीच्या अनुयायांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने यरुशलेम, यहुदिया, शोमरोन इत्यादी भागांतून पुढे सर्वत्र शुभवर्तमान कसे घोषित केले, ह्याचा सविस्तर वृत्तान्त ह्या पुस्तकात शब्दांकित करण्यात आला आहे. ख्रिस्ती श्रद्धेची यहुदी लोकांमध्ये सुरूवात होऊन पुढे संपूर्ण जगात ही चळवळ कशी पसरत गेली, ह्याची ही विस्मयकारक गाथा आहे. लेखकाने हेदेखील स्पष्ट केले आहे की, ख्रिस्ती श्रद्धावंतांचा समुदाय कोणत्याही राजकीय हेतूने संघटित झालेला नसून रोमन साम्राज्याला शह देण्याचा त्याचा मुळीच हेतू नव्हता. तसेच या श्रद्धेमध्ये यहुदी धर्माची परिपूर्णता साधलेली आहे, असे लेखकाने त्याच्या वाचकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
ह्या पुस्तकाचे तीन प्रमुख विभाग पडतात:
1) येशूच्या स्वर्गारोहणानंतर यरुशलेममध्ये झालेला ख्रिस्ती धर्माचा प्रसार
2) पॅलेस्टाइनच्या निरनिराळ्या विभागांत झालेला ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार
3) मध्यपूर्व प्रदेशातून रोमपर्यंत ह्या श्रद्धेने केलेली वाटचाल
ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे पवित्र आत्म्याच्या उपस्थितीची व सामर्थ्याची प्रेषितांना आणि श्रद्धावंतांना आलेली प्रचीती. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्रभावशाली स्वरूपात येथे पानोपानी जाणवते.
येशूने दिलेला मूळ संदेश ह्या पुस्तकात अनेक ठिकाणी सारांशरूपाने सांगितलेला आहे. या संदेशाच्या अंतर्गत सामर्थ्याचा प्रत्यय श्रद्धावंतांच्या जीवनात व प्रत्यक्ष ख्रिस्तसभेच्या म्हणजे चर्चच्या जीवनात सहज जाणवतो.
रूपरेषा
येशूची अंतिम आज्ञा व अभिवचन 1:1-14
यहुदाच्या जागी मत्थियाची निवड 1:15-26
यरुशलेममध्ये साक्ष 2:1-8.3
यहुदिया व शोमरोन येथे साक्ष 8:4-12:25
शुभवर्तमानकार्यासाठी पौलाचा पहिला प्रवास 13:1-14:28
यरुशलेममधील धर्मपरिषद 15:1-35
शुभवर्तमानकार्यासाठी पौलाचा दुसरा प्रवास 15:36-18:22
शुभवर्तमानकार्यासाठी पौलाचा तिसरा प्रवास 18:23-21:16
पौलाचा यरुशलेम, कैसरिया व रोम येथील तुरुंगवास 21:17-28:31

Позначайте

Поділитись

Копіювати

None

Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть