प्रेषितांचे कार्य 8
8
ख्रिस्ती लोकांचा छळ
1शौलाला तर स्तेफनचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेम येथल्या मंडळींचा फार छळ झाला. प्रेषितांखेरीज इतर सर्वांची यहुदिया व शोमरोन या प्रदेशात पांगापांग झाली. 2काही भक्तिमान माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले, त्यांनी त्याच्यासाठी फार शोक केला.
3इकडे शौल श्रद्धावंतांना हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे.
शोमरोन शहरात फिलिपचे आगमन
4ज्यांची पांगापांग झाली होती, ते श्रद्धावंत लोक तर शुभवर्तमान घोषित करीत चहूकडे फिरले. 5फिलिपने शोमरोन येथील मुख्य शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. 6फिलिपचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे लोकसमुदायाने बारकाईने लक्ष दिले. 7ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, त्यांच्यातील पुष्कळांतून अशुद्ध आत्मे किंचाळत निघून गेले. पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. 8त्या नगरात आनंदीआनंद झाला.
शिमोन जादूगार
9त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा शिमोन नावाचा एक माणूस होता. आपण कोणी तरी मोठे आहोत, असे तो दाखवत असे. 10लहानापासून थोरांपर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, ‘हा माणूस म्हणजे जिला देवाची महाशक्ती म्हणतात, तिचाच अवतार आहे.’ 11त्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने विस्मित केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्यावर खिळले होते. 12तरी पण देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयी फिलिप शुभवर्तमान घोषित करीत असता लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि अनेक स्त्रीपुरुषांचा बाप्तिस्मा झाला. 13स्वतः शिमोननेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपच्या सहवासात राहिला. घडत असलेली चिन्हे व मोठे चमत्कार पाहून तो स्वतः आश्चर्यचकित झाला.
शोमरोनमध्ये पेत्र व योहान
14शोमरोन येथील लोकांनी देवाचे वचन स्वीकारले आहे, असे यरुशलेममधल्या प्रेषितांनी ऐकले तेव्हा त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले. 15ते तेथे आल्यावर त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रेषितांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. 16कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. 17नंतर पेत्र व योहान ह्यांनी त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
18प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो, हे पाहून शिमोनने त्यांना पैसे दाखवून म्हटले, 19“ज्या कोणावर मी माझे हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.”
20परंतु पेत्र त्याला म्हणाला, “पैसे देऊन देवाचे दान मिळवता येते, असा विचार केल्याबद्दल तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होवो. 21आमच्या सेवाकार्यात तुला भाग किंवा वाटा नाही कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने योग्य नाही. 22तुझ्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करून प्रभूला विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या विचारांची तुला क्षमा मिळेल. 23तुझ्यात कटू मत्सरभावना आहे आणि तू पापाच्या बंधनात आहेस, असे मला दिसते.”
24तेव्हा शिमोनने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये, अशी विनंती तुम्ही माझ्यासाठी प्रभूजवळ करा.”
25तेथे त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन जाहीर केल्यावर ते यरुशलेम नगरास परत आले, येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांत शुभवर्तमान घोषित केले.
फिलिप व हबशी अधिकारी
26इकडे प्रभूच्या दूताने फिलिपला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमपासून रानातून गाजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” 27तो उठला व निघाला आणि पाहा, हबशी राणीचा दरबारातील महत्त्वपूर्ण अधिकारी व खजिनदार असलेला एक हबशी षंढ यरुशलेमहून परत जात होता. तो उपासना करावयास गेला होता. 28तो परत जाताना त्याच्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता. 29तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.” 30फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले, त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?”
31त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” त्याने फिलिपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. 32तो जो धर्मशास्त्रलेख वाचत होता तो असा:
त्याला मेंढरासारखे वध करण्यासाठी नेले
आणि जसे कोकरू
लोकर कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.
33त्याच्या दीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही,
त्याच्या संततीविषयी
कोणी काहीच सांगू शकणार नाही
कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपवण्यात आले.
34अधिकाऱ्याने फिलिपला म्हटले, ‘मी तुम्हांला विनंतिपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी?’ 35फिलिपने बोलावयास आरंभ केला व ह्या धर्मशास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीचे शुभवर्तमान त्याला सांगितले. 36वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा तो अधिकारी म्हणाला, “पाहा, इथे तर पाणी आहे. मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” 37फिलिपने म्हटले, “जर आपण आपल्या पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरत असाल, तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, असा मी विश्वास धरतो.”
38त्याने रथ उभा करावयास सांगितले. फिलिप व अधिकारी दोघे पाण्यात उतरले. फिलिपने त्याला बाप्तिस्मा दिला. 39ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिपला घेऊन गेला, म्हणून तो त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीस पुन्हा पडला नाही, मग तो आपल्या वाटेने आनंदाने निघाला. 40इकडे फिलिपच्या लक्षात आले की, आपण अजोत नगरात आहोत. पुढे कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने शुभवर्तमान घोषित केले.
Поточний вибір:
प्रेषितांचे कार्य 8: MACLBSI
Позначайте
Поділитись
Копіювати

Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.