प्रेषितांचे कार्य 6

6
सात साहाय्यकांची निवड
1काही दिवसांनंतर श्रद्धावंतांची संख्या वाढत चालली असता ग्रीक यहुदी लोकांची स्थानिक हिब्रू लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली कारण रोजच्या दानधर्म वाटणीत त्यांच्या मते त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. 2तेव्हा बारा प्रेषितांनी श्रद्धावंतांना बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याकडे दुर्लक्ष करून पंक्‍तिसेवेकडे लक्ष पुरवावे, हे ठीक नाही. 3तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात आदरणीय पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू. 4म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
5हा विचार सर्व लोकांना पसंत पडला आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असलेल्या स्तेफनबरोबर फिलिप, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व अंत्युखिया येथील यहुदीमतानुसारी नीकलाव ह्यांची निवड केली. 6त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर सादर केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
7अशा प्रकारे देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या झपाटयाने वाढत गेली आणि याजकवर्गांतीलही पुष्कळ लोकांनी ह्या श्रद्धेचा स्वीकार केला.
स्तेफनवर ह्रा
8परमेश्वराची कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण झालेला स्तेफन लोकांत मोठे चमत्कार व चिन्हे करीत असे. 9मात्र लिबिर्तिन ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघातील लोकांच्या प्रार्थनामंदिरातील काही जण तसेच कुरेनेकर आणि आलेक्सांद्रिया येथील काही यहुदी लोक ह्यांनी त्याला विरोध केला. हे लोक व किलिकिया व आसिया या प्रदेशातील यहुदी लोक स्तेफनबरोबर वितंडवाद घालू लागले. 10पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता, त्याला ते तोंड देऊ शकत नव्हते. 11म्हणून त्यांनी काही लोकांना लाच देऊन ‘आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले’, असे म्हणण्यास सांगितले. 12अशा प्रकारे त्यांनी अनेक लोकांना आणि वडीलजनांना व शास्त्रीजनांना चिथविले. त्यांनी स्तेफनवर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले. 13नंतर त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, “हा माणूस नेहमी ह्या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलत असतो. 14आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, नासरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला दिलेले परिपाठ बदलून टाकील.” 15तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण स्तेफनकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख एखाद्या देवदूताच्या मुखासारखे दिसले.

Позначайте

Поділитись

Копіювати

None

Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть

Відео для प्रेषितांचे कार्य 6