Chapa ya Youversion
Ikoni ya Utafutaji

योहान 13

13
येशू आपल्या शिष्यांचे पाय धुतात
1वल्हांडण सण सुरू होण्यास थोडा अवधी होता. येशूंना माहीत होते की हे जग सोडून पित्याकडे जाण्याची त्यांची वेळ जवळ आली आहे. जगात जे त्यांचे लोक होते, त्यांच्यावर त्यांनी प्रीती केली व शेवटपर्यंत प्रीती केली.
2संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता. 3येशूंना माहीत होते की, पित्याने सर्वगोष्टी त्यांच्या सत्तेखाली ठेवल्या आहेत आणि ते परमेश्वरापासून आले आहेत व त्यांच्याकडे परत जाणार आहेत; 4म्हणून येशू भोजनावरून उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला. 5त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.
6ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?”
7येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, पण नंतर कळेल.”
8पेत्र म्हणाला, “नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.”
येशू म्हणाले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”
9शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!”
10यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत.” 11आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही.
12त्यांचे पाय धुतल्यावर त्यांनी कपडे पुन्हा अंगावर घातले आणि आपल्या जागी परत आले व आपल्या शिष्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला समजले का? 13तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे. 14आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. 15जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे. 16मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही. 17आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही त्याप्रमाणे कराल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल.
आपल्या विश्वासघाताविषयी येशूंचे भविष्य
18“मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला#13:18 किंवा आपली टाच उचलली आहे आहे.’#13:18 स्तोत्र 41:9 हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.
19“मी तुम्हाला हे आताच, घडून येण्यापूर्वी सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा तसे घडून येईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे. 20मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जे कोणी ज्याला मी पाठविले त्याला स्वीकारतात, ते मला स्वीकारतात आणि जे कोणी मला स्वीकारतात ते ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतात.”
21असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकूळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.”
22त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना. 23त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता. 24“कोणाविषयी सांगत आहे हे विचारून आम्हास सांग,” असे शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावून विचारले.
25तो येशूंच्या उराशी टेकलेला असता, म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”
26येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतला दिला. 27यहूदाहने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला.
येशूंनी त्याला म्हटले, “जे तू करणार आहेस, ते आता त्वरेने कर.” 28येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही. 29काहींना वाटले की यहूदाहच्या हाती पैशाचा कारभार असल्यामुळे सणासाठी काही विकत घ्यावे किंवा गरिबांना काही द्यावे म्हणून येशूने सांगितले असेल. 30मग तो भाकरीचा तुकडा घेतल्याबरोबर, यहूदाह बाहेर निघून गेला. तेव्हा रात्र होती.
पेत्राच्या नकाराविषयीचे भविष्य
31तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे; 32जर परमेश्वराचे गौरव त्यांच्यामध्ये झाले तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करतील आणि लवकरच गौरव करतील.
33“माझ्या मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. मग तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूदी पुढार्‍यांना सांगितले, तसेच आता तुम्हालाही सांगतो: मी जिथे जाणार, तिथे तुम्हाला येता येणार नाही.
34“मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. 35तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”
36शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?”
येशूंनी उत्तर दिले, “मी जिथे जातो, तिथे आता तुला माझ्यामागे येता येणार नाही, परंतु नंतर तू माझ्यामागे येशील.”
37त्यावर पेत्र म्हणाला, “प्रभू, मला आताच तुम्हाला का अनुसरता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा प्राण देईन.”
38येशूंनी उत्तर दिले, “माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय? मी तुला निश्चित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील!

Iliyochaguliwa sasa

योहान 13: MRCV

Kuonyesha

Shirikisha

Nakili

None

Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia