योहान 12
12
बेथानी येथे येशूंना तैलाभ्यंग
1वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते तो लाजर जिथे राहत होता त्या बेथानी गावी येशू आले. 2तिथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता. 3मरीयेने अर्धा शेर#12:3 अंदाजे 0.5 लीटर, शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि तिने त्यांचे पाय आपल्या केसांनी पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.
4परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदाह इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला, 5“वास्तविक ते तेल विकून येणारे पैसे गोरगरिबांना देता आले नसते का? त्या तेलाचे मोल एका वर्षाच्या मजुरीएवढे#12:5 मूळ भाषा ग्रीकमध्ये 300 दिनारी होते.” 6त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असे म्हणाला नाही, तर तो चोर होता; व पैशाच्या पिशवीचा मालक असून, जे काही त्यात टाकले जाई त्यातून स्वतःसाठी काढून घेत असे.
7त्यावर येशू म्हणाले, “तिला असू दे, माझ्या उत्तरक्रियेसाठी सुगंधी तेल तिने बचत करून ठेवले होते. 8गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर राहतील,#12:8 अनु 15:11 परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.”
9तितक्यात येशू तिथे आले आहेत हे कळल्यावर यहूदी लोकांचा समुदाय तिथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्या लाजराला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली. 10हे पाहून मुख्य याजकांनी लाजराला देखील जिवे मारण्याची योजना केली. 11यासाठी की अनेक यहूदी लोक लाजरामुळे येशूंवर विश्वास ठेवू लागले होते.
यरुशलेममध्ये येशूंचा राजा म्हणून प्रवेश
12दुसर्या दिवशी येशू यरुशलेमला येत आहेत ही बातमी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या समुदायाने ऐकली. 13त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले,
“होसान्ना!#12:13 हा इब्री शब्द ज्याचा अर्थ “तारण कर!” असा आहे नंतर तो शब्द स्तुतीचा उद्गार झाला”
“प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”#12:13 स्तोत्र 118:25
“इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”
14येशूंना एक गाढवीचे शिंगरू सापडले व ते त्यावर बसले, शास्त्रलेखात असे लिहिले आहे:
15“सीयोनकन्ये भिऊ नको;
पाहा, तुझा राजा येत आहे
गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.”#12:15 जख 9:9
16हे प्रथम त्यांच्या शिष्यांना समजले नाही; परंतु येशूंचे गौरव झाल्यानंतर त्यांना समजून आले की, ज्यागोष्टी येशूंबद्दल लिहिल्या गेल्या होत्या त्याच गोष्टी त्यांच्यासाठी करण्यात आल्या होत्या.
17येशूंनी लाजराला कबरेमधून बाहेर बोलाविले व मरणातून उठविले, त्यावेळेस जो लोकसमुदाय तिथे होता त्यांनी वचनाचा प्रचार करणे सुरू ठेवले. 18ज्यांनी त्या चिन्हाबद्दल ऐकले होते, असे अनेक लोक येशूंना भेटण्यासाठी गेले. 19यास्तव परूशी एकमेकांना म्हणू लागले, “आपण काहीच साध्य केले नाही. पाहा, सारे जग कसे त्याच्यामागे जात आहे!”
येशूंचे आपल्या मृत्यूविषयीचे भविष्य
20सणाच्या उपासनेला हजर राहण्यासाठी जे ग्रीक लोक आले होते, 21ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, “महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे.” 22तेव्हा फिलिप्पाने त्याबद्दल आंद्रियाला सांगितले; मग त्या दोघांनी येशूंना सांगितले.
23येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. 24मी तुम्हाला निश्चित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकच दाणा राहतो. परंतु तो मेला तर बहुत पीक देतो. 25जो कोणी आपल्या जिवावर प्रीती करतो, तो आपल्या जीवास मुकेल आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करेल, तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखेल. 26जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील.
27“आता माझा जीव अस्वस्थ झाला आहे, मी काय म्हणू? ‘हे पित्या, या घटकेपासून मला वाचव?’ नाही, केवळ याच कारणासाठी मी या घटकेस आलो आहे. 28हे पित्या, आपल्या नावाचे गौरव करा!”
नंतर स्वर्गातून वाणी आली, “मी ते गौरविले आहे आणि पुनः गौरवेन.” 29जो लोकसमुदाय तिथे उभा असून ऐकत होता तो म्हणाला, ही गर्जना झाली; इतर म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला.
30तेव्हा येशू म्हणाले, “ती वाणी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी होती. 31आता या जगाचा न्यायनिवाडा होण्याची वेळ आहे आणि जगाच्या अधिपतीला बाहेर टाकण्यात येईल. 32आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन.” 33आपण कोणत्या प्रकारे मरणार आहोत हे सुचविण्यासाठी येशू असे बोलले.
34जमावाने म्हटले, “नियमशास्त्रामधून आम्ही ऐकले आहे की ‘ख्रिस्त सर्वदा राहील, तर मानवपुत्राला उंच केले पाहिजेत’ असे तुम्ही कसे म्हणता? हा ‘मानवपुत्र’ कोण आहे?”
35तेव्हा येशूंनी त्यांना उत्तर दिले, “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्याबरोबर राहील. तुम्हावर अंधकाराने मात करण्यापूर्वी प्रकाश आहे तोपर्यंत चालत राहा, कारण जो कोणी अंधारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही. 36तुम्ही प्रकाशाची मुले व्हावी म्हणून जोपर्यंत तुम्हाबरोबर प्रकाश आहे, तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलले व तिथून निघून त्यांच्यापासून गुप्त राहिले.
यहूदीयांचा विश्वास आणि अविश्वास
37येशूंनी अनेक चिन्हे त्यांच्यासमोर केली असतानाही, ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. 38नेमके हेच भविष्य यशायाह संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले:
“प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला
आणि प्रभूचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?”#12:38 यश 53:1
39परंतु या कारणाने ते विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण, यशायाहने इतरत्र असेही म्हटले आहे:
40“म्हणून परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत
आणि त्यांची हृदये कठोर केली होती,
म्हणजे त्यांना डोळ्यांनी दिसू नये,
किंवा अंतःकरणाने समजू नये,
किंवा ते वळू नये—जेणे करून मी त्यांना बरे करेन.”#12:40 यश 6:10
41यशायाहने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.
42त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते; 43कारण परमेश्वराकडून मिळणार्या स्तुतीपेक्षा त्यांना मानवाकडून मिळणारी स्तुती अधिक प्रिय होती.
44नंतर येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी मजवर विश्वास ठेवतात ते फक्त मजवरच विश्वास ठेवतात असे नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर ठेवतात; 45जे मला पाहतात ते वास्तविक ज्यांनी मला पाठविले त्यांनाच पाहतात. 46मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये.
47“जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. 48जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील. 49कारण मी माझे स्वतःचे बोलत नाही, ज्या पित्याने मला पाठविले, त्यांनी मी काय सांगावे व काय बोलावे याची मला आज्ञा दिली आहे. 50त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
Iliyochaguliwa sasa
योहान 12: MRCV
Kuonyesha
Shirikisha
Nakili
Je, ungependa vivutio vyako vihifadhiwe kwenye vifaa vyako vyote? Jisajili au ingia
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.