YouVersion Logo
Search Icon

मत्तय 15

15
जे विटाळविते
1परूशी आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंकडे येऊन विचारू लागले, 2“तुमचे शिष्य आपल्या वाडवडिलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!”
3येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या प्रथा पाळण्याकरिता तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा का मोडता? 4परमेश्वर म्हणाले, ‘तुझ्या वडिलांचा आणि आईचा मान राख’#15:4 निर्ग 20:12; अनु 5:16 आणि ‘जे कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतात तो मरणदंडास पात्र व्हावा.’#15:4 निर्ग 21:17; लेवी 20:9 5परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे. 6अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता. 7अहो ढोंग्यांनो! यशया संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे, तो म्हणतो:
8“ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात,
पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत.
9माझी उपासना ते व्यर्थपणे करतात;
त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ”#15:9 यश 29:13
10येशूने गर्दीतील लोकांना आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका आणि समजून घ्या. 11मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अपवित्र करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अपवित्र करते.”
12थोड्या वेळाने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन विचारले, “आपल्या उद्गारांनी परूशी लोकांची मने दुखावली आहेत हे तुम्हाला कळले काय.”
13येशू म्हणाले, “माझ्या स्वर्गीय पित्याने न लावलेले प्रत्येक झाड उपटून टाकण्यात येईल. 14त्यांच्याकडे लक्ष देऊ नका; ते आंधळे मार्गदर्शक आहेत. जर एक आंधळा मनुष्य दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवेल, तर ते दोघेही खाचेत पडतील.”
15पेत्र म्हणाला, “आम्हाला हा दाखला स्पष्ट करून सांगा.”
16“तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?” येशूंनी त्यांना विचारले. 17“तुम्हाला हे समजत नाही काय की, जे मुखात जाते ते पोटात उतरते आणि शरीरातून बाहेर पडते? 18परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात. 19कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदाही बाहेर पडतात; 20आणि हेच मनुष्याला अशुद्ध करतात. परंतु हात धुतल्याशिवाय अन्न खाल्याने ते अशुद्ध होत नाहीत.”
कनानी स्त्रीचा विश्वास
21नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले. 22एक कनानी स्त्री त्या विभागातून येशूंकडे आली आणि त्यांना विनवणी करून म्हणाली, “प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा! माझ्या मुलीला भूतात्म्याने ग्रस्त झाली असून, ती पुष्कळ छळ सहन करीत आहे.”
23पण येशूंनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही; तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, “प्रभुजी, तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागे सारखी ओरडत येत आहे.”
24तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.”
25परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभुजी, मला मदत करा.”
26येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”
27“हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”
28ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याचक्षणी तिची मुलगी बरी झाली.
येशू चार हजारांना अन्न पुरवितात
29नंतर येशूंनी ते ठिकाण सोडले आणि गालील सरोवराच्या किनार्‍याने गेले. मग ते एका डोंगरावर जाऊन बसले. 30खूप मोठी गर्दी त्यांच्याजवळ जमली. लोकांनी आपल्यातील लंगडे, आंधळे, मुके, अपंग आणि इतर रोगांनी आजारी असलेल्यांना त्यांच्या चरणांजवळ आणले आणि त्या सर्वांना त्यांनी बरे केले. 31मुके बोलू लागले, जे लंगडे होते ते चालू लागले आणि आंधळे पाहू लागले. सर्व जमाव आश्चर्यचकित होऊन इस्राएलाच्या परमेश्वराची मनःपूर्वक स्तुती करू लागला.
32येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावले आणि ते त्यांना म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येत आहे. कारण ते येथे तीन दिवसापासून आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. त्यांना तसेच उपाशी पाठवून देण्याची माझी इच्छा नाही, नाही तर ते रस्त्यातच पडतील.”
33शिष्यांनी उत्तर दिले, “एवढ्या लोकांना पुरेल इतके अन्न या ओसाड रानात कोठून आणावे?”
34येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
शिष्यांनी उत्तर दिले, “सात भाकरी आणि काही लहान मासे.”
35तेव्हा त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले. 36मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले आणि त्या मोडल्या व शिष्यांना दिल्या आणि त्यांनी ते लोकांना वाढले. 37-38ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. तेथे जे जेवले ते चार हजार पुरुष होते, त्याशिवाय स्त्रिया व लेकरेही होती. 39येशूंनी लोकांना घरी जाण्यास निरोप दिल्यानंतर ते एका होडीत बसून मगादान नावाच्या भागात आले.

Currently Selected:

मत्तय 15: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in