उत्पत्ती 26

26
इसहाक आणि अबीमेलेख
1त्या देशात दुष्काळ पडला—अब्राहामाच्या काळात पडला त्या खेरीज हा दुसरा दुष्काळ होता—म्हणून इसहाक गरार या शहरात पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याजकडे गेला. 2याहवेहने तिथे इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “खाली इजिप्त देशात जाऊ नकोस; मी तुला सांगतो त्या देशात राहा. 3या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन. 4मी तुझ्या वंशजांची संख्या असंख्य तार्‍यांसारखी करेन. मी हा सर्व प्रदेश तुझ्या वंशजांना देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. 5कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.” 6म्हणून इसहाक गरारातच राहिला.
7जेव्हा तेथील लोकांनी त्याला त्याच्या पत्नीबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” कारण “ती माझी पत्नी आहे” असे सांगण्याची त्याला भीती वाटली; त्याने विचार केला, “या ठिकाणचे लोक रिबेकाहमुळे कदाचित मला मारून टाकतील, कारण ती फार सुंदर आहे.”
8तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे. 9अबीमेलेखाने इसहाकाला बोलाविणे पाठविले आणि त्याला म्हणाला, “निश्चितच ही तुझी पत्नी आहे, ‘तर ती माझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?”
इसहाकाने उत्तर दिले, “तिच्यामुळे माझा कोणी वध करेल अशी मला भीती वाटली.”
10अबीमेलेखाने उद्गार काढले, “तू आमच्यासोबत असे का केले? माझ्या लोकांपैकी कोणीही तिच्यासोबत निजला असता आणि तू आमच्यावर दोष आणला असतास.”
11यानंतर अबीमेलेखाने जाहीर फर्मान काढले: “या मनुष्याला किंवा याच्या पत्नीला कोणी त्रास दिल्यास त्याला मृत्यूची शिक्षा दिली जाईल.”
12इसहाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला शंभरपट पीक मिळाले, कारण याहवेहने इसहाकाला आशीर्वादित केले. 13तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला. 14त्याच्याकडे इतके मेंढ्या, गुरे आणि नोकर होते की पलिष्ट्यांनी त्याचा हेवा केला. 15म्हणून ज्या विहिरी त्याचा पिता अब्राहाम याच्या नोकरांनी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवून टाकल्या.
16तेव्हा अबीमेलेखाने इसहाकाला म्हटले, “तू आमच्यापासून दूर निघून जा; तू आमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली झाला आहेस.”
17तेव्हा इसहाकाने ते ठिकाण सोडले आणि गरारच्या खोर्‍यात तळ देऊन राहू लागला. 18इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.
19इसहाकाच्या नोकरांनी खोर्‍यात एक नवी विहीर खणली आणि तिथे त्यांना गोड पाण्याचा एक झरा सापडला. 20मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक#26:20 म्हणजे मतभेद असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले. 21मग त्यांनी दुसरी एक विहीर खणली; पण तिच्यावरूनही पुन्हा भांडणे झाली, म्हणून तिचे नाव सितनाह#26:21 म्हणजे आक्षेप असे ठेवले. 22यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ#26:22 म्हणजे विस्तीर्ण जागा असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.”
23पुढे इसहाक तिथून बेअर-शेबाला गेला; 24त्याच रात्री याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा पिता अब्राहामाचा परमेश्वर आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन आणि तुझा वंश वाढवेन.”
25मग इसहाकाने तिथे एक वेदी बांधली आणि याहवेहची उपासना केली. त्याने तिथे वस्ती केली आणि तिथे त्यांच्या नोकरांनी एक विहीर खणली.
26एके दिवशी त्याला भेटण्यासाठी गरारहून अबीमेलेख, त्याचा सल्लागार अहुज्जाथ आणि त्याचा सेनापती पीकोल हे आले. 27“तुम्ही येथे का आला?” इसहाकाने त्यांना विचारले, “कारण तुम्ही मला द्वेषाने वागवून हाकलून दिले होते.”
28यावर ते म्हणाले, “आम्हाला हे स्पष्टपणे दिसत आहे की, याहवेह तुला आशीर्वादित करीत आहेत; तुझ्याशी —तुझ्या आणि आमच्यामध्ये एक करार करावा असे आम्हाला वाटले. म्हणून आम्हाला तुमच्याबरोबर करार करू द्यावा. 29आम्ही जसा तुला कसलाही उपद्रव दिला नाही, तसा तू आम्हाला कसलाही उपद्रव देणार नाहीस, असे वचन दे. उलट आम्ही तुझे भलेच केले आणि तुला शांतीने जाऊ दिले; आणि आता तू याहवेहद्वारे आशीर्वादित झाला आहे.”
30इसहाकाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांनी खाणेपिणे केले. 31पहाटेस उठल्याबरोबर त्यांनी एकमेकांशी करार केला. नंतर इसहाकाने त्यांना निरोप दिला व ते शांतीने परतले.
32त्या दिवशी इसहाकाचे नोकर त्याच्याकडे येऊन त्याला सांगू लागले. “आम्ही खणीत असलेल्या विहिरीला पाणी लागले आहे!” 33त्याने तिला शिबाह#26:33 म्हणजे सात किंवा शपथ म्हटले, आणि आजपर्यंत या नगराचे नाव बेअर-शेबा असे आहे.
याकोब एसावाचा आशीर्वाद घेतो
34एसावाने त्याच्या चाळिसाव्या वर्षी यहूदीथ नावाच्या बवरी हिथीच्या मुलीसोबत आणि एलोन हिथी याची कन्या बासमाथ हिच्याबरोबरही विवाह केला. 35त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या.

Podkreślenie

Udostępnij

Kopiuj

None

Chcesz, aby twoje zakreślenia były zapisywane na wszystkich twoich urządzeniach? Zarejestruj się lub zaloguj